धारावीत पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या २८ वर्षीय मोहिनीची मृत्यूशी झुंज अखेर संपली. रविवारी रात्री सायन रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. ३० मे रोजी आईच्या प्रियकराने तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते, त्यात ७० टक्के भाजलेल्या मोहिनीवर मागील पाच दिवसांपासून सायन रुग्णालयात सुरू होते. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीवर लावण्यात आलेल्या कलमात वाढ करून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहिनी जैस्वार (२८) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ३० मे रोजी झालेल्या जाळपोळीत मोहिनी ७० टक्के भाजली होती. तिला सायन रुग्णालयात तिच्यावर उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मोहिणी ही आईसोबत धारावीतील राजीव गांधी नगरात राहण्यास होती, वडिलांच्या मृत्यूनंतर आरोपी नंदकुमार पटेल हा मोहिनीचा आणि तिच्या आईचा सांभाळ करून त्यांना आर्थिक मदत करीत होता. अनेक वर्ष नंदकुमार याच्यावर अवलंबून असलेल्या मायलेकिना अलीकडेच काम मिळाले होते. मोहिनी ही एका खासगी कंपनीत तर आई काजोलला देखील काम मिळाले होते, त्यामुळे या दोघी आता नंदकुमार पटेल याच्यावर अवलंबून नव्हत्या, व त्याला त्या टाळू लागल्या होत्या. त्याला घरी येण्यास मनाई करू लागल्या होत्या, या गोष्टीवरून मोहिनी आणि नंदकुमार यांच्यात वाद झाला. या वादात नंदकुमार याला अपमानित वाटू लागले.
(हेही वाचा – मुंबई विमानतळावर दोन प्रकरणांत १० किलो सोने जप्त; चौघे ताब्यात)
३० मे रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मोहिनी ही घराच्या बाहेर बसलेली असताना नंदकुमार पटेल हा घरी आला व त्याने घरात जाण्याच्या प्रयत्न केला असता मोहिनीने त्याला रोखले. घरात जाण्यास मनाई करून येथून निघून जाण्यास सांगितले. अपमानित झालेल्या नंदकुमार पटेल हा रागाच्या भरात बाहेर पडला, व पुन्हा आला त्यावेळी त्याच्या हातात पेट्रोलने भरलेली बॉटल होती, काही कळण्याच्या आता त्याने दारात बसलेल्या मोहिनीच्या अंगावर पेट्रोलने भरलेली बॉटल रिकामी करून तिला पेटवून दिले होते. या जाळपोळीत मोहिनी ७० टक्के भाजली होती. ती सायन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना रविवारी तिची प्राणज्योत मालवली. धारावी पोलिसांनी याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या नंदकुमार पटेल याच्यावर दाखल करण्यात आलेल्या कलमात वाढ करून हत्येचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community