पोलीस ठाण्यांची बँक खाती सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील नवघर पोलीस ठाण्याच्या बँक खात्यावर जमा असलेल्या लाखो रुपयांवर डल्ला मारून हे पैसे दुसऱ्या खात्यावर वळते करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी विनोद सिंग नावाच्या व्यक्तीवर फसवणूक, बोगस दस्तवेज कट रचणे सह गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा बँकेचा कंत्राटी कर्मचारी असून कल्याण येथे राहण्यास आहे. या धक्कादायक घटनेनंतर मुंबईतील सर्व पोलीस ठाण्याचे बँक खाते तपासण्यात येत आहे.
गुन्ह्यातील जप्त केलेली रक्कम तसेच इतर रोख रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांचे बँक खाते ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक’ नावाने उघडले जाते. हे खाते हाताळण्याचा अधिकार संबधीत पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (प्रशासन) आणि सेफ मुद्देमाल हवालदार यांना देण्यात आले आहे. या खात्यात गुन्ह्यातील जप्त केलेली रोख रक्कम सुरक्षित म्हणून जमा केली जाते, पोलीस ठाण्यात बदलून येणाऱ्या प्रत्येक वरिष्ठ अधिकारी,पोलीस निरीक्षक (प्रशासन) आणि सेफ मुद्देमाल हवालदार यांची जवाबदारी या बँक खात्यावर असते.
मुलुंड पूर्व येथे असणाऱ्या नवघर पोलीस ठाण्याचे मुलुंड पूर्व येथील ‘बँक ऑफ बडोदा’ या बँकेत २००३ मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवघर पोलीस ठाणे यांच्या नावे उघडण्यात आले आहे. २००३ मध्ये तत्कालीन वपोनि. एल.डी. खरपडे हे होते. या खात्यात २००३ मध्ये फसवणूक, बोगस दस्तावेज प्रकरणातील गुन्ह्यातील आरोपीकडून जप्त केलेली १६ लाख ८० हजार २७२ रुपयांची रोकड बँक खात्यावर जमा करण्यात आली होती. २००३ ते २०२२ या कालावधीत या पोलीस ठाण्यात ९ वरिष्ठ पोलीस निरीक्षक होऊन गेले, परंतु या ९ ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी हे खाते स्वतःच्या अधिकारात घेण्याची तसदी घेतलेली नाही, त्यामुळे हे खात्यावर २००३ मध्ये असलेले तत्कालीन वपोनि. खरपडे यांचेच नाव अद्याप ही बँक खात्यावर आहे.
(हेही वाचा – Honduras Prison Riot : तुरुंगात उसळली दंगल, ४१ महिला कैद्यांचा मृत्यू)
नवघर पोलीस ठाण्याचे सेफ मुद्देमाल हवालदार राणे यांनी गेल्या वर्षी जून महिण्यात बँकेतील खात्याचा तपशील तपासला असता बँक खात्यात ३२ लाख रक्कम व्याजासहित जमा असल्याचे कळले. दरम्यान नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदाचे पदभार स्वीकारणारे नवीन अधिकारी गिरप यांनी या बँक खात्याची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर मुद्देमाल हवालदार राणे यांनी १७ जून २०२३ रोजी बँकेत जाऊन खात्याची माहिती घेतली असता बँकेने दिलेल्या बँक स्टेटमेंट मध्ये नवघर पोलीस ठाण्याच्या खात्यावर केवळ ३२ रुपये शिल्लक असल्याची आढळून आले. हवालदार राणे यांनी पुन्हा एकदा खाते तपासले असता खात्यावर असलेल्या ३२ लाख ऐवजी केवळ ३२रुपयांची शिल्लक असल्याचे समोर आले. राणे यांनी याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली.
एका वर्षात नवघर पोलीस ठाण्याच्या खात्यातून ३२ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती, नवघर पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक आणि बोगस दस्तावेज प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता तत्कालीन वपोनि. खरपडे यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या नावाने कागदपत्रे तयार करण्यात आले व धनादेशद्वारे १२ मे २०२३ रोजी ५ लाख १० हजार रुपये रोकड काढली होती, त्यानंतर नेट बँकिंगच्या द्वारे काही रक्कम दुसऱ्या खात्यावर वळती करण्यात आली होती. तपास पथकाने तांत्रिक तपासावरून आरोपीचा शोध घेतला असता विनोद सिंग असे नाव तपासात समोर आले. विनोद सिंग हा बँकेंचा कंत्राटी कर्मचारी असल्याचे समोर आले, व सद्या त्याची बदली दुसऱ्या शाखेत करण्यात आली असून तो कल्याण येथे राहण्यास असल्याची माहिती तपासात समोर आली. नवघर पोलिसांनी तात्काळ कल्याण येथून विनोद सिंग याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community