सरकारी कंत्राटदारावर गोळीबार करणाऱ्या ४ हल्लेखोरांना कुर्ला पोलिसांनी भिवंडी येथून अटक केली आहे. या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी समीर सावंत आणि गणेश चुकल हे दोघे फरार असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. या चौघांना हल्ल्यासाठी एक लाख रुपये देण्यात आले होते अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. म्हाडाच्या कामाच्या टेंडर वादातून हा हल्ला करण्यात आला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
( हेही वाचा : गोरेगावमधील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे सुशोभिकरण कोणाच्या निधीतून? जिल्हा नियोजन समिती की महापालिका? )
सागर येरूनकर (२९), करण थोरात(२०), अभिषेक सावंत (२६) आणि विनोद कांबळी (२९) असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून हे चौघे घाटकोपर पश्चिम येथे राहणारे आहेत. सागर येरूनकर हा मुख्य हल्लेखोर आहे. दहिसर पूर्व येथे राहणारे सरकारी कंत्राटदार सूरज प्रतापसिंग देवडा यांच्यावर सोमवारी सायंकाळी कुर्ला पश्चिम कपाडिया नगर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता ही गोळी मोटारीला लागल्यामुळे देवडा हे हल्ल्यात थोडक्यात बचावले होते. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी देवडा यांच्या तक्रारीवरून समीर सावंत आणि गणेश चुकल यांच्यासह दोन अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हल्लेखोरांच्या शोधासाठी परिमंडळ पाच मधील पोलीस ठाण्याचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने हल्लेखोरांचा शोध घेऊन भिवंडीतून चौघांना अटक केली. दहिसर येथे राहणारे धरम कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक सुरजप्रताप सिंग देवडा यांनी म्हाडाकडून काढण्यात आलेले वांद्रे ते दहिसर पायवाट, नाले यांचे ४५ कोटींचे म्हाडाचे टेंडर भरले होते. हे टेंडर मागे घ्यावे व त्याकरिता मोबदला म्हणून काही रक्कम देण्यात येईल अशी धमकी समीर सावंत आणि गणेश चुकल यांनी दिली होती. हल्ल्याच्या १५ दिवसांपूर्वी गणेश चुगल याने व्हॉट्सअप कॉन्फरस कॉलवर सूरज यांना धमकी दिली की, मी दिलेली सौदा मान्य करा अन्यथा ” दुनिया गोल है हम जल्लदी मिलेंगे ” असे धमकावले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी समिर सावंतच्या ओळखीचा येरूनकर या व्यक्तीने सूरज यांना कॉल करून टेंडर मागे घे अशी धमकी दिली होती असे सुरजप्रताप सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.
Join Our WhatsApp Community