वर्सोवा चार बंगला या ठिकाणी असणाऱ्या भारत नगर परिसरात गुन्हे शाखेने छापेमारी करून ५०० लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या परिसरात दुधात भेसळ करणारी टोळी कार्यरत असून ही टोळी मागील काही वर्षांपासून नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करून मोठ्या प्रमाणात भेसळ युक्त दुधाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळत होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रामलिंगया गज्जी आणि काटमैया नरसिया पुलीपालूपुला असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध अन्न व औषध भेसळ विरोधी कायदा तसेच फसवणूक इत्यादी कलमाअंतर्गत वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्सोवा जुहू लिंक रोड हॉटेल बनाना लिफ समोर असणाऱ्या भारत नगर या ठिकाणी एका खोलीत मोठ्या प्रमाणात दुधाची भेसळ करण्यात येत असून हे भेसळयुक्त दुधाची परिसरात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे, अशी माहिती गुन्हे शाखा कक्ष ९च्या पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने अन्न व औषध प्रशासन यांच्या सोबत शुक्रवारी पहाटे भारत नगर येथील एका घरात छापा टाकला. या छापेदरम्यान पोलिसांना बघून एक इसम पळून जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. छापा टाकण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोकुळ, अमूल या सारख्या नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या भरलेल्या व अर्धवट भरलेल्या पिशव्या आणि भेसळीसाठी लागणारे साहित्य मिळून आले. या ठिकाणी ताब्यात घेतलेला इसम हा दुधाच्या पिशवीला एका बाजूने लहान भोक पाडून इंजेक्शन सिरीजच्या माध्यमातून या पिशवीतील दूध काढून त्यात पाणी मिसळत असताना मिळून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून ५०० लीटर दूध तसेच भेसळीसाठी लागणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान दुधाची डिलिव्हरी करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला दूध घरोघरी टाकताना ताब्यात घेऊन या प्रकरणात त्याला देखील अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – लालबाग हत्याकांड : लखनौमधून एकाला घेतले ताब्यात, मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी मदत केल्याचा संशय)
Join Our WhatsApp Community