शिवडी परिसरात एका ८ वर्षीय विद्यार्थिनीवर अरबी शिकविणाऱ्या ६५ वर्षीय शिक्षकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांचे, तरुणींचे अश्लील व्हिडीओ काढून त्यांना ब्लँकमेल करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारच्या घटनांमुळे येथील महिला, तरुणी आणि लहान बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
( हेही वाचा : ‘रेल नीर’ साठी पंधरा रुपयेच द्या! रेल्वेचे प्रवाशांना आवाहन )
शिवडी परिसरात राहणारी ८ वर्षांची पीडित मुलगी ही, अरबी भाषा शिकण्यासाठी जवळच असणाऱ्या ६५ वर्षाच्या अरबी शिक्षकाकडे जात होती. या शिक्षकाने पीडित मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर लैगिंग अत्याचार केला, व याची वाच्यता कुठे करू नको अन्यथा ठार मारेल अशी धमकी दिली. ८ वर्षाच्या मुलीवर लैगिंग अत्याचार करण्यात आल्यानंतर ती घरी आली व तिच्या पोटात दुखू लागले, तिला त्रास होऊ लागल्यामुळे तिने झालेला प्रकार आईला सांगितला. मुलीवर झालेल्या प्रसंगामुळे आईला धक्काच बसला, तिने तात्काळ मुलीला नजीकच्या रुग्णालयात आणून तिच्यावर उपचार करून शिवडी पोलीस ठाणे गाठले. शिवडी पोलिसांनी ६५ वर्षीय अरबी शिक्षकावर लैगिंग अत्याचार तसेच बाल लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती शिवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सहाणे यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक टोळी केबल ऑपरेटर असल्याचे सांगून दिवसाढवळ्या घरात घुसून घरात स्पाय कॅमेरे लावून, महिला आणि तरुणीचे अश्लील चित्रीकरण करून या चित्रीकरणाच्या माध्यमातून महिला आणि तरुणींना ब्लॅकमेल करीत होती, हा प्रकार उघडकीस येताच महिलांनी शिवडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली मात्र शिवडी पोलिसांनी त्यांची वेळीच दाखल न घेतल्यामुळे महिलांनी पोलीस उपायुक्तांकडे ( पोर्ट झोन) धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. पोलीस उपायुक्तांनी तात्काळ दखल घेऊन शिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हा, येलो गेट पोलीस ठाण्यात नोंदवून आरोपींना अटक केली होती. शिवडी हा परिसर गोदाम, भंगार विक्रेते आणि झोपड्यांनी व्यापलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातावर पोट भरणारे कुटुंब राहण्यास आहे. आई वडील मोलमजुरी करण्यासाठी घराबाहेर पडत असल्यामुळे अशा घटनांमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Join Our WhatsApp Community