बीकेसी येथील डायमंड मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या एका हिरे व्यावसायिकाला व्यापारी बनून आलेल्या तिघांनी ९८ लाखाला चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या ठगा विरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
सतीश चांदपरा असे हिरे व्यवसायिकाचे नाव आहे. सांताक्रूझ येथे राहणारे सतीश चांदपरा हे बीकेसी येथील डायमंड मार्केट येथे हिऱ्याचा व्यावसाय करतात. वर्षभरापूर्वी चांदपरा यांची डायमंड ब्रोकर नरसीभाई खोरडिया, रमेशभाई सोनी आणि लोकेश रावजीभाई यांच्यासोबत ओळख झाली होती. खोरडीया हे गुजरात राज्यात राहणारे असून रमेश सोनी हे अंधेरी तर लोकेश हा गोरेगाव येथे राहणारा आहे. काही महिन्यांपूर्वी हे तिघे डायमंड मार्केट येथे चांदपरा यांच्या कार्यालयात आले व डायमंड ब्रोकर यांच्यावर चौकशी आली आहे, असे सांगून ९८ लाख किमतीचे हिरे पसंद करून ते एका पाकिटात पॅक करून हे पाकीट तुमच्याकडेच सध्या ठेवा आम्ही पैसे देऊन नंतर घेऊन जाऊ, असे सांगून निघून गेले.
(हेही वाचा २३ जानेवारीला उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे एका मंचावर?; शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच येणार एकत्र)
पाकिटात चक्क नकली हिरे होते
काही दिवस त्यांची वाट बघितल्यावर चांदपरा यांनी या ब्रोकर ला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही, दरम्यान चांदपरा यांनी पॅकबंद हिऱ्याचे पाकीट उघडले असता त्यांना धक्काच बसला त्या पाकिटात चक्क नकली हिरे होते, या तिघांनी हात चलाखी करून असली हिरे काढून त्या जागी नकली हिरे ठेवले होते. आपली फसवणूक झाल्याचे कळताच चांदपरा यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. बीकेसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून या तिन्ही ठगांचा कसून शोध घेत आहे.