भूमाफियांची गॉडमदर, लेडी डॉन करीना उर्फ आपा शेख हिच्यासह तीन जणांविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीर बांधकामाला विरोध करणारे माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर, विक्रोळीतील कन्नमवार नगर आणि नेताजी नगर या ठिकाणी बेकायदेशीर झोपड्या, बांधकामे बांधणाऱ्या भूमाफियांची मोठ्या प्रमाणात दहशत आहे. त्यापैकीच एक करीना शेख या लेडी डॉनचे नाव सर्वात पुढे आहे. बेकायदेशीर बांधकामांना विरोध करणारे स्थानिक माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांच्यासोबत भूमाफियांचा वाद सुरू आहे.
मनपाने ४ जुलै रोजी करीना शेखच्या सांगण्यावरून बेकायदा बांधकाम पाडले होते. हे बेकायदा बांधकाम करीना शेखचा सहकारी अक्रम अन्सारी याचे होते असे माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे. करीना शेखच्या सांगण्यावरून विविध प्रकारच्या धमक्या देण्यासाठी अन्सारी माझ्या कार्यालयात येत असे. करीना शेख कोणत्याही दिवशी आपली ओळख लपवून माझ्या कार्यालयात येऊन मला गोळ्या घालून ठार करु शकते आणि माझे काय झाले हे ही कोणास कळू देणार नाही अशी धमकी अन्सारीने दिल्याचे परमेश्वर कदम यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
कदम यांनी ४ जुलै रोजी कामराज नगरमध्ये आणखी काही बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारतींबाबत तक्रार केलेल्या होत्या. ही बेकायदेशीर बांधकामे पालिकेने पाडली. त्यानंतर अन्सारीने फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे. “तक्रारदाराने दिलेला जबाब आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे, आम्ही करीना शेख, अन्सारी आणि त्यांचा आणखी एक साथीदार राधाकृष्ण हरिजन यांच्यावर गुन्हेगारी कट आणि गुन्हेगारी धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे,” असे पंत नगर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
(हेही वाचा – Western Expressway : पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरीजवळ वाहतूक कोंडी, उड्डाणपुलाखाली वाहनांच्या रांगा)
पूर्व उपनगरातील गॉडमदर ….
खून, खंडणी आणि अवैध शस्त्रास्त्रांचा व्यापार करणे या प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या करीमा शेख उर्फ आपा उर्फ करीमा मुजी शाह ही घाटकोपरमध्ये ‘गॉडमदर’ म्हणून ओळखली जाते. घरातून पळून आलेल्या अल्पवयीन मुलांना तसेच नोकरीच्या शोधात परराज्यातून मुंबईत येणाऱ्या तरुणांना आश्रय देऊन त्यांना गुन्हेगारीकडे वळवणारी करीना शेख ही या तरुणांसाठी आपा आणि मम्मी म्हणून ओळखली जाते. ती चालवत असलेल्या टोळीतील गुंड आपा, मम्मी या नावाने संबोधतात.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत नोकरीच्या शोधात येणाऱ्या तरुणांना तसेच घरातून पळून येणाऱ्या अल्पवयीन मुलांना करीना शेख आश्रय देते व त्यांना चोरी, घरफोडीचे धडे देते. त्यानंतर ही मुले तिच्या इशाऱ्यावरून चोरी, दरोडे आणि चेन स्नॅचिंग करून चोरीचा सर्व ऐवज करीनाकडे जमा करतात. घाटकोपर पूर्वेकडील कामराज नगर झोपडपट्टी पट्ट्यात रहाणाऱ्या करीना शेख हीने बेकायदेशीर घरे बांधण्यास सुरुवात केली. ही घरे भाड्याने देऊन त्यातून येणाऱ्या पैशांतून तिचा उदरनिर्वाह चालत होता. पुढे हीच संपत्ती विकून तीने भरपूर पैसा कमावला. २०२० मध्ये मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने तिला शेवटची अटक केली होती त्यानंतर ती जामिनावर बाहेर पडली आणि वर्सोवात राहण्यास आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community