ऑनलाइन पार्टटाईम जॉब रॅकेट उद्ध्वस्त, 18 जणांना अटक

ऑनलाइन पार्टटाइम जॉबच्या नावाखाली अनेकांना आर्थिक गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. राजस्थानच्या खेड्यात बसून मुंबई तसेच आसपासच्या शहरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणारी ही टोळी मुंबई सायबर गुन्हे शाखेने मुळापासून उपटली आहे. मुंबई, नालासोपारा, राजस्थान येथून अठरा जणांच्या या टोळीला अटक करण्यात आली असून त्यामध्ये एका चिनी नागरिकाचा आणि मुंबईतील एका बँक कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम,व्हाट्सअॅप सारख्या सोशल मीडियावर ‘ऑनलाइन पार्टटाइम जॉब’ ची जाहिरात करून तसेच व्हाट्सअॅप टेलिग्रामवर मॅसेज करुन ही टोळी नागरिकांना गंडवत होती. मुंबई महानगर पालिकेतील सेवानिवृत्त इंजिनियरकडून या टोळीने ऑनलाइन पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली तसेच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यास सांगितले होते.
सेवानिवृत्त इंजिनियर यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई ३४ लाख रुपये ऑनलाइन पार्टटाईम जॉबच्या नादात गमावले होते. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच सेवानिवृत्त इंजिनियर यांनी सायबर गुन्हे पोलीस ठाणे उत्तर विभाग या ठिकाणी तक्रार दाखल केली. सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बाळसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रादेशिक विभाग सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चंदनशिवे यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला, या तपासादरम्यान मीरा भायंदर परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडून देणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती सायबर पोलीसांना मिळाली.
भायंदर रेल्वे स्थानक परिसरातून बँक खाते तयार करून देणाऱ्याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत पोलिसांनी ऑनलाइन जॉब रॅकेट राजस्थानमध्ये असून नालासोपारा या ठिकाणी या टोळीसाठी काही जण काम करीत असल्याचे समोर आले. सायबर पोलिसांनी एकेक करून नालासोपारा, कांदिवली, गोरेगाव, राजस्थानमधील अजेमर, भिलवाडा येथून अठरा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीजवळून पोलिसांनी १७ विविध बँकांचे चेकबूक, पासबूक, एटीएम आणि डेबिट कार्ड, ५३ मोबाईल फोन, ११५ विविध कंपन्यांचे सिमकार्ड, वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने तयार केलेले ४७ रबरी शिक्के, आधारकार्ड, पॅन कार्ड आणि वाहन परवाने मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक जण बँक कर्मचारी आहे, तर एक जण चीनचा नागरिक आहे. तसेच बँक खातेधारक आणि मुख्य कॉलर आहेत. ऑनलाइन जॉब रॅकेटच्या माध्यमातून फसवणूक करणारी एक संपूर्ण टोळी उद्ध्वस्त करण्यात आली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here