जीपेवर हप्ता घेणारा तो कथित पोलीसवाला कोण ? मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

मरीन ड्राईव्हवर रात्रीचे बसण्यासाठी एकाला अडीच हजार रुपये भरावे लागले, हे पैसे पोलीस असल्याचे सांगून कारवाई न करण्याकरिता ‘जी-पे’ च्या माध्यमातून घेतल्याचा आरोप या व्यक्तीने ट्विट करून केला आहे. त्याने पैसे दिल्याचा पुरावा म्हणून आपल्या खात्याचे स्क्रीन शॉट ट्विटरवर शेअर केले आहेत.
याबाबत मात्र मुंबई पोलिसांकडून पैसे घेणारे पोलीस नसावे कोणीतरी भामटे असल्याचा दावा करण्यात येत आहे, मात्र तक्रारदाराने समोर येऊन सर्व माहिती सोबत शेअर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पीडित विघ्नेश किशन याने शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ट्विट करून एका पोलिसाने त्याच्याकडून मरीन ड्राईव्ह येथे बसलो असता पैसे घेतले, असे ट्विट करून सांगितले.  किशनने त्याच्या ट्विटमध्ये जी पे  व्यवहाराचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने आतिश जाधव नावाच्या व्यक्तीला अडीच हजार दिले असल्याचे दाखवले होते.
हे ट्विट एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले की या ट्विटला १,३८२ रिट्विट्स, ६,३९६ लाईक्स आणि ८.२१  लाख व्ह्यूज मिळाले.  मुंबई पोलिसांनीही या ट्विटला  उत्तर दिले आणि किशनला थेट मेसेज करून घटनेचा तपशील शेअर करण्यास सांगितले.
किशनकडून लाच घेणार्‍या कथित पोलिसाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली.“आम्ही आमचे सर्व पोलीस अंमलदार  तपासले आहेत. ज्या नावावर जी पे ने व्यवहार झाला त्या नावाचे किंवा मोबाईलचे कोणीही व्यक्ती आढळली नाही. आम्ही त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तो बंद होता. नंबर वापरणाऱ्या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही तांत्रिक तपास करत आहोत,” असे मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश बागुल यांनी सांगितले.
पोलिसांनी रविवारी संध्याकाळी किशनला त्याच्या ट्विटमध्ये ही माहिती दिली. किशनने मात्र अद्याप त्यांना प्रतिसाद दिलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “आम्ही किशन येण्याची आणि औपचारिक जबाब नोंदवण्याची वाट पाहत आहोत, कारण ते आमच्या चौकशीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, घटना नेमकी कुठे घडली ते किमान आम्ही ओळखू शकू जेणेकरून आम्ही तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासू शकू,” असे बागुल यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here