कुठले तंत्रज्ञान कुठल्यावेळी पोलिसांच्या मदतीसाठी धावून येईल याचे एक उदाहरण म्हणजे टिळक नगर पोलीसांनी उघडकीस आणलेला दरोड्याचा गुन्हा! टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या विभागातील वायफाय राऊटरवर नियंत्रण मिळवून आरोपी घरात असलेल्या राऊटरचा क्रमांक शोधून दरोडेखोराला जेरबंद केले आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा येथे राहणारे एका संस्थेचे विश्वस्त संस्थेसाठी जमीन खरेदी करण्यासंदर्भात घाटकोपर राजवाडी परिसरात आले होते. या दरम्यान काही इसम रिक्षातून आले व या विश्वस्थांना मारहाण करून त्यांच्या हातातील पैशांनी भरलेली बॅग खेचून पळून गेले होते. २५ नोव्हेंबर रोजी ही घटना घडल्यानंतर टिळक नगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. विश्वस्थांनी टोकन मनी म्हणून आणलेली २५ लाखांची रोकड दरोडेखोरांनी पळवली होती.
परिमंडळ ६चे पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे, पोलिस निरिक्षक सरिता चव्हाण, राठोड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल वाघमारे, पो.उनी.विजयसिंग देशमुख,अजय गोल्हार तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील सुनील पाटील, संजय शिंदे,सुनील बनकर, साठेलकर,सानप, भालेराव, पिंजारी या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही आणि टॉवर लोकेशनवरून तपास पथकाने एका दरोडेखोरांची ओळख पटवली.
अर्षद खान असे या दरोडेखोरांची ओळख पटली व अर्षद खान हा घाटकोपर पश्चिम नारायण नगर परिसरात राहण्यास असल्याची माहिती मिळाली. नारायण नगर परिसर एवढा मोठा व दाटीवाटीचा असल्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांना अवघड झाले होते, त्यात तो त्याचा फोन केवळ इंटरनेटच्या माध्यमातून वापरत असल्यामुळे त्याचे लोकेशन सापडत नव्हते.
नारायण नगर परिसरात अनेकजण इंटरनेटसाठी वायफाय कनेक्शन वापरत असल्यामुळे अर्षद खान हा देखील वायफाय वापरत असावा या अंदाजाने तपास पथकातील सायबर तज्ज्ञ अजय गोल्हार यांनी इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपनीला गाठले आणि त्या विभागातील वायफाय राऊटर कनेक्शन काही वेळाकरता बंद करून पुन्हा सुरू करण्यात सांगितले.
इंटरनेट बंद करून सुरू केल्यानंतर बंद झालेले वायफाय राऊटर सुरू होऊन राऊटरचे नंबर इंटरनेट पुरवठादाराकडे सापडले. त्या क्रमांकाच्या सहाय्याने तपास पथकाने अर्षद खान याचे घर शोधून त्याला अटक केली. अर्षद खानच्या अटकेनंतर एकेक करून ६ दरोडेखोरांना अटक करून टिळक नगर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला.
Join Our WhatsApp Community