कोरोना काळात झालेल्या मुंबई महानगर पालिकेच्या खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीकडून (ED) शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांना बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. ईडीने खिचडी घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या मनीलोंड्रिग प्रकरणात ही पहिलीच अटक केली आहे. गुरुवारी सूरज चव्हाण यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून वेगळा तपास सुरू असून आर्थिक गुन्हे शाखेकडून चव्हाण यांची काही महिन्यांपूर्वी चौकशी करण्यात आली होती.
कोरोना काळात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या खिचडी घोटाळा प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने खिचडी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या आधारे अंमलबजावणी संचालनालय (ED) ने खिचडी घोटाळा प्रकरणात मनीलोनदीरिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. ईडीकडून या प्रकरणात सूरज चव्हाण यांना चौकशीसाठी बोलावून त्यांची चौकशी देखील केली होती.
बुधवारी सायंकाळी ईडीकडून (ED) बोलविण्यात आलेले सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना मनीलिंदरिंग प्रकरणात अटक केली आहे. सूरज चव्हाण यांच्या अटकेमुळे शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने खिचडी घोटाळा प्रकरणी उबाठा शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर यांची सहा तास चौकशी केली.मात्र अमोल कीर्तिकर यांचा खिचडी घोटाळ्यातील भूमिका अद्याप स्पष्ट झालेली करण्यात आलेली नाही. अमोल कीर्तिकर हे आमदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहे. सुरुवातीला आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि इतर सहा विरुद्ध ६.३७ कोटी रुपयांच्या खिचडी घोटाळ्या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यात महानगर पालिकेने कोविड-१९ साथीच्या काळात स्थलांतरित कामगारांना ‘खिचडी’ वाटपाचे कंत्राट देताना आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे . मुंबई पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांची प्राथमिक चौकशी केली होती.
Join Our WhatsApp Community