एक मोटार मॅकेनिक दोन सिव्हिल डिप्लोमा होल्डर अशा तीन मित्रांनी २ कोटी रुपयांची विमा पॉलिसी मिळविण्यासाठी रचलेल्या भयंकर कटामुळे नगर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि शासकीय रुग्णालय यंत्रणा हादरली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या एका बेवारस व्यक्तीला खोटी ओळख देऊन भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) कडून २ कोटी रुपयांचा विमा लाटण्याचा प्रयत्न या तीन मित्रांनी एका महिलेच्या मदतीने केला.
या तिघांनी रचलेल्या कटाचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश करून अहमदनगर जिल्ह्यातून या तिघांना अटक केली आहे. या तिघांनी ज्या बेवारस मृतदेहावर दावा केला त्या मृतदेहाची या तिघांनी विल्हेवाट लावल्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवणे पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केलेल्या या तिघांना सरकारी यंत्रणेतील काही जणांनी मदत केली असावी, अशी शक्यता असून त्या अनुषंगाने तपास केला जात आहे.
दिनेश टाकसाळे, अनिल कटके आणि विजय माळवदे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून हे तिघे मूळचे अहमदनगर जिल्ह्यात राहणारे आहेत. या टोळीत एका महिलेचादेखील समावेश असून तिने मृत पॉलिसी धारकच्या आईची भूमिका निभावली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार अनिल लटके आहे. दिनेश टाकसाळे,लटके आणि माळवदे हे तिघे जवळचे मित्र आहेत. दिनेश हा वाहन मॅकेनिक असून लटके आणि माळवदे सिव्हिल डिप्लोमा होल्डर आहेत.
( हेही वाचा: Maharashtra budget 2023-2024 : तीर्थस्थळांसाठी भरीव तरतूद; महाराष्ट्रातील पाचही ज्योर्तिलिंगांचे संवर्धन )
दादर शिवाजी पार्क येथील भारतीय आयुर्विमा (एलआयसी) कंपनीच्या कार्यालयात एक ५० ते ५५ वयोगटातील महिलेने काही वर्षांपूर्वी मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा करून त्याच्या मृत्यूची कागदपत्रे एलआयसी कार्यालयात सादर करून मुलाच्या २ कोटींच्या जीवन विमा पॉलिसीवर दावा केला होता. नंदा टाकसाळे असे या महिलेने स्वतःचे नाव सांगून दिनेश टाकसाळे हा तिचा मुलगा असून २०१६ मध्ये त्याचा नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा महामार्ग येथे अपघाती मृत्यू झाल्याचे दाव्यात म्हटले होते.
या महिलेच्या दाव्यानंतर एलआयसीच्या कायदेशीर टीमने कागदपत्रे तपासून या प्रकरणाचा पाठपुरावा घेण्यास सुरुवात केली. त्यात पॉलिसी धारक दिनेश टाकसाळे जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर एलआयसीकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केशवकुमार कसारे सपोनि.मंगेश जमदाडे,पोउनी. योगेश राणे आणि पथक यांनी तपास सुरू केला.
शिवाजी पार्क पोलीस पथकाने अहमदनगर जिल्ह्यातून दिनेश टाकसाळे, अनिल कटके आणि विजय माळवदे या तिघांना अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता, या तिघांनी २०१६ मध्ये हा कट शिजवला होता. या कटात या तिघांनी आईची भूमिका करण्यासाठी एका महिलेला पैसे दिले होते. दिनेश टाकसाळे याच्या नावावर २ कोटी रुपयांचा जीवन विमा उतरविण्यात आला होता. वर्षभराने या तिघांनी नगर जिल्हयातील दौड येथील शासकीय रुग्णालयातील शवगृहातील बेवारस मृतदेह दिनेश टाकसाळे याचा असल्याचा दावा करून पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून दिनेश टाकसाळे याचे अपघाती निधन झाले झाल्याचे कागदपत्रे तयार करून घेतले. मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार (विल्हेवाट) करण्यात आले. त्यानंतर भारतीय आर्युविमा महामंडळाकडे दिनेश टाकसाळे याच्या २ कोटींच्या विम्यासाठी दावा करण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community