- प्रतिनिधी
सोने तस्करांना सोने विमानतळामधून बाहेर काढून देण्यासाठी विमानतळ कर्मचाऱ्यांकडून मदत केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे कर्मचारी सोने बाहेर काढून देण्याच्या मोबदल्यात १० ते १५ टक्के कमिशन घेत असल्याचे सीमा शुल्क विभागाने मागील काही महिन्यांत केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत सोने तस्करांसह तीन विमानतळ कर्मचाऱ्यांना १० कोटींच्या सोन्यासह अटक करण्यात आली आहे. (Gold Smuggling)
सोन्याचा भाव जसजसा गगनाला भिडत आहे, तसतशी परदेशातून सोने तस्करीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. दुबई, शारजाह येथून सीमा शुल्क बुडवून भारतात मोठ्या प्रमाणात सोने लपवून आणले जात आहे. सोने तस्करांकडून प्रत्येकवेळी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून भारतात सोन्याची तस्करी केली जात आहे. या तस्करांवर सीमा शुल्क विभाग तसेच भारतातील केंद्रीय तपास यंत्रणा यांची करडी नजर असून मागील काही महिन्यांत सीमा शुल्क विभाग, डीआरआय यांच्याकडून सोने तस्करांवर कारवाई करण्यात आली आहे. सोने तस्करांचे एक सिंडिकेट असून या सिंडिकेटकडून सोने तस्करीसाठी परदेशातून भारतात निघालेल्या महिलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. (Gold Smuggling)
(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या पोस्टवर बांगलादेशला पोटशूळ; सल्लागार म्हणतात, भारत फक्त…)
या महिला परदेशातून आणलेले सोने अंतर्वस्त्रात लपवून विमानतळाबाहेर काढतात. सीमा शुल्क विभागाच्या अनेक कारवाईमध्ये महिलांच्या अंतर्वस्त्रातून तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. सीमा शुल्क विभागाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सोने तस्करांसह ३ विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक करून जवळपास १० कोटींचे सोने त्यांच्याजवळून जप्त करण्यात आले आहे. डीआरआयच्या पथकाने देखील काही आठवड्यांपूर्वी सोन्याच्या तस्करी प्रकरणी विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक केली होती. (Gold Smuggling)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तस्करांकडून विमानतळातून तस्करीचे सोने सुखरूप बाहेर काढण्यासाठी विमातळावरील फूड कोर्टमध्ये काम करणारे, तसेच विमानतळावरील सफाई कर्मचारी, लोडर, यांना तस्करांकडून पैशांचे आमिष दाखवून सोने बाहेर काढण्यासाठी त्यांची मदत घेतली जाते. फूड कोर्टमधील कर्मचारी खाण्याच्या पार्सलमधून तर सफाई कर्मचारी कचरा बाहेर टाकण्याच्या निमित्ताने हे सोने विमानतळाच्या बाहेर आणून बाहेर उभ्या असलेल्या तस्करांच्या व्यक्तीच्या ताब्यात दिले जाते. येथील लोडर देखील त्याच्या बॅगेतून, जेवणाच्या डब्ब्यातून सोने विमानतळावरून बाहेर काढून देण्यास मदत करतात. मोबदल्यात या कर्मचाऱ्यांना तस्करांकडून १० ते १५ टक्क्यांचे कमिशन दिले जाते असे तपासात समोर आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. (Gold Smuggling)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community