Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडण्याची पोलिसांवर वेळ का आली? पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण

780
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडण्याची पोलिसांवर वेळ का आली? पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडण्याची पोलिसांवर वेळ का आली? पोलिसांनी सांगितलं नेमकं कारण

बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. यावळी नेमकं काय घडलं? अक्षय शिंदेवर गोळी झाडण्याची पोलिसांवर वेळ का आली? याबाबत पोलीस अधिकारी संजय शिंदे (Police Officer Sanjay Shinde ) यांनी एफआयआरमध्ये खुलासा केला आहे. (Akshay Shinde Encounter)

पोलीस अधिकारी संजय शिंदे यांचा एफआयआरमधील जबाब (Akshay Shinde Encounter)

मी संजय रामचंद्र शिंदे, वय-57 वर्षे,
मी सन 1992 पासून महाराष्ट्र पोलीस दलात नोकरीस असून दि. 03/09/2024 पासून मध्यवर्ती गुन्हे शाखा, ठाणे शहर येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. मी बदलापुर पूर्व पोलीस ठाणे गु.र.नं. 409/2024 भा.द.वि.स.क. 377, 324, 504, 506 या गुन्ह्याचा तपासकामी मा. पोलीस आयुक्त, वर्ग ठाणे शहर यांच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकात तपास करीत असून सदर गुन्ह्याचा मी तपासी अधिकारी आहे.

बदलापुर पूर्व पोलीस ठाणे गु.र.नं. 380/2024 या मुन्द्रात तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी अक्षय शिंदे हा आमच्याकडे तपासावर असलेल्या वर नमुद गु.र.नं. 409/2024 या गुन्ह्यात आरोपी असल्याने त्याचा ताबा मिळवण्यासाठी मा. जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालय, 7 कल्याण यांच्याकडुन दि. 20/09/2024 रोजी ताबा वॉरन्ट घेण्यात आले होते. दि. 23/09/2024 रोजी सदर तपास पथकातील मी सपोनि निलेश मोरे, नेम. अंमली पदार्थ विरोधी पथक ठाणे शहर, पो. हवालदार/3745 अभिजीत मोरे व पोहवा/5729 हरिश तावडे असे सरकारी वाहनाने दुपारी 14.00 वा. मध्यवर्ती गुन्हे शाखा येथील ठाणे दैंनंदिनीमध्ये नोंद करुन तळोजा मध्यवर्ती कारागृहाकडे रवाना झालो होतो. मी व सपोनि निलेश मोरे यांनी सरकारी पिस्टलसोबत घेतले होते. त्यावेळी मी माझे पिस्टलमध्ये 5 राउंड लोड केलेले होते.

दि. 23/09/2024 रोजी 17.30 वाजता, तळोजा मध्यवर्ती कारागृह येथुन आरोपी अक्षय शिंदे यांस कायदेशीर प्रकिया पूर्ण करुन ताब्यात घेऊन आम्ही पोलीस पथक व्हॅनने मध्यवर्ती गुन्हे शाखा, ठाणे शहर येथे निघालो होतो. मी सदर वाहनामध्ये ड्रायव्हरच्या बाजूस पुढे बसलो होतो व सपोनि निलेश मोरे आणि 2 अंमलदार आरोपीसह वाहनाचे मागील बाजूस बसले होते. सदर वाहन शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आले असता सपोनि/निलेश मोरे यांनी मला त्यांच्या मोबाईल फोनवरुन फोन करुन आरोप अक्षय शिंदे हा, मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात? आता मी काय केले आहे?, असे रागाने बोलत असून शिवीगाळ करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे मी वाहन थांबवून आरोपीला शांत करण्याच्या उद्देशाने वाहनाच्या मागील भागात आरोपीच्या समोर पोहवा/हरिश तावडे यांच्या बाजूला येऊन बसलो. त्यावेळी आमच्या समोरच्या बाजूस सपोनि.मोरे व पोह.ह/ अभिजीत मोरे यांच्यामध्ये आरोपी अक्षय शिंदे बसला होता.

आम्ही सरकारी वाहनाने आरोपी अक्षय शिंदे यास घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्याजवळ आलो असता 18.15 वाजताच्या सुमारास सदर आरोपी अक्षय शिंदे हा अचानक सपोनि/निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेले सरकारी पिस्टल बळाचा वापर करुन खेचू लागला असता सपोनि/निलेश मोरे यांनी आरोपी अक्षय शिंदे यास अडविण्याचा प्रयत्न केला. आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळी मला जाऊ द्या, असं म्हणत होता. झटापटीमध्ये सपोनि निलेश मोरे यांचे पिस्टल लोड झाले व त्यातील 1 राउंड हा सपोनि निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले. त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांचे पिस्टलचा ताबा घेऊन “आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही” असे रागा रागाने ओरडुन आम्हास बोलू लागला, त्यानंतर आरोपी अक्षय शिंदे याने माझे व हरिश तावडे यांच्या दिशेने त्याचे हातातील पिस्टल रोखून आम्हाला जीवे ठार मारण्याच्या उद्धेशाने आमच्यावर 2 गोळ्या झाडल्या. परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत.

आरोपी अक्षय शिंदेचे रौद्र रुप व देहबोली पाहून तो त्याच्याकडील पिस्टलमधून आमच्यावर गोळ्या झाडून आम्हाला जीवे मारणार अशी माझी पुर्णपणे खात्री झाली म्हणून मी प्रसंगावधान राखून मी व माझे सहकारी यांचे स्वरक्षणार्थ माझेकडील पिस्टलने 1 गोळी आरोपी अक्षय शिंदे याच्या दिशेने झाडली. त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला आणि त्याच्या हातातील पिस्टलचा ताबा सुटला, त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळवले व वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पीटल, कळवा येथे आणून मी अक्षय शिंदे व निलेश मोरे औषधोपचारसाठी दाखल झाले. त्यानंतर निलेश मोरे व मला पुढील औषधोपचारसाठी ज्युपीटर हॉस्पीटलला येथे दाखल केले असून वैद्यकीय उपचार चालु आहेत. आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापुर्वीच मयत झाला असल्याचे मला नंतर समजले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.