चिकन तंदुरीच्या पैशांवरून झालेल्या भांडणात पाच जणांनी मिळून मुख्यमंत्री कार्यालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्यासह दोघांवर दोघांवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची घटना मुलुंड पश्चिमेत घडली. या हल्ल्यात मुख्यमंत्री यांच्या मंत्रालयातील कार्यालयात काम करणारा शिपाई अक्षय नार्वेकर याचा मृत्यू झाला, तसेच दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सायन रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांंनी हत्येचा गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली. (Crime)
अक्षय नार्वेकर (३०) आणि आकाश साबळे (३०) असे हल्ला करण्यात आलेल्या दोघांची नावे असून या हल्ल्यात अक्षय नार्वेकर याचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील किसन नगर वागळे इस्टेट येथे राहणारा अक्षय हा मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात शिपाई म्हणून नोकरीला होता अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली. इम्रान मेहमुद खान (२७), सलिम मेहमूद खान (२९), फारुख बागवान (३८), नौशाद बागवान (३५) आणि अब्दुल बागवान (४०) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे असून इम्रान आणि सलिम हे दोघे सख्ये भाऊ असून फारुख नौशाद आणि अब्दुल हे तिघे सख्ये भाऊ आहेत. (Crime)
इम्रान याचे ठाण्यातील किसन नगर येथे चिकन सेंटर असून सलीम याचे मुलुंड वैशाली नगर येथे मुंबई ए-१ चिकन सेंटर आहे. इतर तिघे आरोपी खाजगी नोकरी करतात. रविवारी दुपारी अक्षयने हा इम्रान याच्या ठाण्यातील चिकन सेंटर येथून चिकन तंदुरी घेतली होती, त्याचे २०० रुपये झाल्याने इम्रानने अक्षयकडे पैशांची मागणी केली. अक्षयने रोख पैसे नसल्याचे सांगून थोड्या वेळाने पैसे देतो असे इम्रानला सांगितले. परंतु इम्रानने चिकन तंदुरीचे पैसे आताच हवे आहे असे सांगून अक्षयला धमकी दिली. अक्षयने रोख पैसे नसल्याने त्याने डेबिट कार्ड दिले परंतु इम्रान याची स्वाईप मशीन बंद होते, अखेर अक्षयने गुगल पे ने पैसे इम्रानला पैसे दिले. (Crime)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राज ठाकरे यांची पहिली सभा नारायण राणेंसाठी)
आरोपींना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी
हा वाद तिथे संपल्यानंतर अक्षय आणि आकाश हे दोघे सायंकाळी ७ वाजता मुलुंड पश्चिम येथील सलीमच्या चिकन सेंटरवर आले व त्या ठिकाणी इम्रान आणि सलीम एकत्र उभे होते, दुपारी झालेल्या चिकन तंदुरीच्या पैशावरून इम्रान आणि अक्षय यांच्यात झालेल्या वाद पुन्हा उफाळून आला. त्यानंतर त्यांच्यात हातापायी झाली, स्थानिकांनी त्याचा वाद मिटवून अक्षय आणि आकाशला ठाण्याचे दिशेने पाठवले, अक्षय आणि आकाश वैशाली नगर बस स्थानकाच्या अलीकडे उभे असताना सलीम आणि इम्रान हे दोघे घरून चिकन कापण्याचा सुरा आणि लोखंडी रॉड घेऊन आले, त्याच्यासोबत बागवान बंधू आले व पाचही जणांनी मिळून अक्षय आणि आकाशला मारहाण करण्यास सुरुवात केली. (Crime)
सलीमने अक्षय आणि आकाशला चाकूने भोकसले, व इम्रानने अक्षयच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून जखमी केले, दोघेही जमिनीवर कोसळतात हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तो पर्यंत जखमींना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी जखमी दोघांपैकी अक्षयला मृत घोषित केले व आकाशवर प्राथमिक उपचार करून सायन रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध हत्या, कट रचणे, हत्येचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना रात्री ठाणे, मुलुंड परिसरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाचही जणांना सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community