मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील (New India Co-operative Bank Scam) १२२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी एका व्यावसायिकाच्या मुलाला अटक केली आहे, असे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी या प्रकरणातील फरार आरोपी उन्नाथन अरुणाचलमचा (Accused Unnathan Arunachalam) मुलगा मनोहर अरुणाचलम (३३) याला अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत झालेली ही चौथी अटक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर अरुणाचलम (Manohar Arunachalam) हा चार्टर्ड अकाउंटन्सचा अभ्यास करत आहे आणि मालाडमध्ये ‘मॅगस कन्सल्टन्सी’ नावाची फर्म देखील चालवतो. (NICB)
गुरुवारी संध्याकाळी, आर्थिक गुन्हे शाखेने उन्नाथन अरुणाचलम उर्फ अरुण याच्याविरुद्ध नोटीस जारी केली आणि त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केले. उन्नतनवर गैरव्यवहार केलेल्या रकमेतून ४० कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. आरोपी उन्नाथन देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्याच्याविरुद्ध लूकआउट नोटिस देखील जारी करण्यात आली आहे.
मुलाने पळून जाण्यास मदत केली
मनोहरने त्याच्या वडिलांना पळून जाण्यास मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. तपासात असेही समोर आले आहे की जेव्हा उन्नाथन अरुणाचलम फरार झाला तेव्हा मनोहर त्याच्यासोबत होता. तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, उन्नाथन अनेकदा मॅगस कन्सल्टन्सीच्या (Magus Consultancy) कार्यालयात बसायचा. अटक केलेले न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे जनरल मॅनेजर आणि अकाउंट्स प्रमुख हितेश मेहता हे या कार्यालयात त्यांना दोनदा भेटायला आले होते.
अधिकाऱ्याने सांगितले की, हितेश मेहता यांनी मे २०१९ मध्ये अरुण भाईंना १५ कोटी रुपये रोख आणि ऑगस्ट २०१९ मध्ये १८ कोटी रुपये रोख त्याच कार्यालयात सुपूर्द केले होते. या व्यवहारांदरम्यान मनोहर देखील उपस्थित होते. १७ फेब्रुवारी रोजी मनोहरला त्याच्या वडिलांसोबत त्याच्या घराजवळ पाहिले गेले. यानंतर, उन्नथन एका ऑटो रिक्षात बसून बोरिवलीकडे जाताना दिसला. दरम्यान आरोपीला दहिसर येथून अटक करण्यात आले असून ४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
(हेही वाचा – Sharad Pawar शाडो कॅबिनेटच्या माध्यमातून काँग्रेस-ठाकरे सेनेला शह देणार?)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकेच्या रोख तिजोरीची तपासणी केली तेव्हा न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळा उघडकीस आला. यानंतर, दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, जो नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. आतापर्यंत, आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात मुख्य आरोपी हितेश मेहता, बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू आणि रिअल इस्टेट डेव्हलपर धर्मेश पौण यांना अटक केली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community