अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरण: बडतर्फ अधिकारी सुनील मानेला होतोय पश्चाताप

168

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात तुरुंगात असलेल्या आरोपींपैकी बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील मानेला त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत असल्याचे त्याने विशेष न्यायालयाकडे केलेल्या अर्जात म्हटले आहे. तसेच या प्रकरणातील संपूर्ण परिस्थिती आणि वस्तुस्थिती पूर्ण आणि सत्य सांगण्याचा निर्णय घेतला असून एक संधी देण्यात यावी अशी विनंती सुनील माने याने न्यायालयाकडे केली आहे. विशेष न्यायालयाने माने याच्या अर्जाची दखल घेऊन ८ मार्चपर्यंत एनआयएला आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

“माझ्या तुरुंगवासाच्या दरम्यान मी खोलवर विचार केल्यावर मला माझी चूक कळली आहे, एक पोलीस अधिकारी असल्याने देशातील नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य होते. पण दुर्दैवाने आणि नकळत माझ्याकडून काही चुका घडल्या. या चुकांचा पश्चात्ताप करण्यासाठी आणि पीडिताला (हिरेन) आणि त्याच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मी या प्रकरणातील संपूर्ण परिस्थिती आणि वस्तुस्थिती पूर्ण आणि सत्य प्रकट करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे म्हणत सुनील मानेने न्यायालयाला विनंती केली. त्याची सेवा रेकॉर्ड विचारात घ्या आणि त्याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत “माफी देऊन त्याच्या चुकांचा पश्चात्ताप करण्याची संधी” द्या असे मानेने गुरुवारी दाखल केलेल्या त्यांच्या हस्तलिखित याचिकेत म्हटले आहे.

याचिकेत पुढे असे म्हटले आहे की, त्यांच्या २६ वर्षांच्या “उत्कृष्ट” सेवेत, अनेक प्रशंसा आणि सुमारे २८० पुरस्कार आणि बक्षिसे मिळवली आहेत. हा अर्ज स्वेच्छेने करण्यात आला होता आणि त्याच्या लिखित संमती शिवाय रेकॉर्डवरील त्याच्या वकिलालाही तो मागे घेण्याची परवानगी देऊ नये, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

(हेही वाचा – अमेरिकेतून वाचविण्यात आले मुंबईतील इंजिनियरचे प्राण)

काय होते प्रकरण?

२५ फेब्रुवारी २०२१ रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थान असलेल्या अँटिलिया बाहेर एक महिंद्रा स्कॉर्पिओ स्फोटकांनी भरलेली आढळून आली होती, तसेच अंबानी कुटुंबातील सदस्यांना धमकी देणारी चिठ्ठी देखील स्कॉर्पिओमध्ये मिळून आली होती. दरम्यान स्कॉर्पिओ या वाहनाचा मालक आणि ठाण्यातील व्यवसायिक मनसुख हिरेन याची हत्या करून ५ मार्च मुंब्राजवळील खाडीत मृतदेह टाकण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे देण्यात आला होता. एनआयएने या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे, पोलीस निरीक्षक सुनील माने, निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासह ९ जणांना अटक करण्यात आली होती. या कटाचा मुख्य सूत्रधार सचिन वाझे हा असल्याचे तपासात समोर आले असल्याचे एनआयए म्हटले आहे. या प्रकरणात एनआयए विशेष न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.