मुंबईतील कुर्ला, सीएसएमटी, दादर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर एक व्यक्ती हल्ला करणार असल्याची माहिती देणारा संदेश मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. औरंगाबाद गंगाखेड येथून फोन करणाऱ्या या व्यक्तीने गुजरात पोरबंदर येथून येणारी एक व्यक्ती कुर्ला, सीएसएमटी, दादर स्थानकांवर हल्ला करेल असे सांगितले.
दिलेल्या माहितीत तथ्य नाही…
नवी मुंबईच्या ११२ क्रमांकावर हा कॉल आला होता. त्यानंतर नवी मुंबई हेल्पलाईनकडून याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. यानंतर रेल्वे पोलीस व संबंधित यंत्रणांना याबाबतची माहिती देण्यात आली. या संदर्भात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तपासणी केल्यावर याबाबत कोणतेही तथ्य आढळले नाही.
याआधीही घडल्या अशा घटना
यापूर्वी सुद्धा मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश आले होते. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अनोळकी क्रमांकावरून संदेश सुद्धा पाठवण्यात आला होता. अशा घटनांमुळे सुरक्षा यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community