- प्रतिनिधी
मुंबई शहरासह उपनगरात गुन्हे करून आंबिवलीच्या इराणी वस्तीत आसरा घेणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) ३० ते ३५ इराणी महिला आणि पुरुषांनी हल्ला करून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला पळवून लावल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच जण जखमी झाले आहे. या हल्ल्याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ जणांना अटक करण्यात आली आहे. आंबिवली रेल्वे स्थानकावर पोलिसांवर (Mumbai Police) केलेल्या या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
(हेही वाचा – Maharashtra Politics : चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सहा सदस्यांची विधान परिषदेची आमदारकी रद्द)
मुंबईतील अंधेरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार ओनु लाला इराणी (२०) हा आंबिवली इराणी वस्ती येथे असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पालवे हे पोलीस पथकासह ओनु लाला इराणी याला अटक करण्यासाठी आंबिवलीच्या इराणी वस्तीत गेले होते. पोलिसांनी (Mumbai Police) ओनू याला ताब्यात घेऊन पोलीस वाहनांच्या ताफ्याकडे निघाले असताना ओनु लाला इराणीच्या नातेवाईकांनी संपूर्ण इराणी वस्तीत गोंधळ घालून पोलिसांना विरोध करू लागले. काही वेळातच इराणी वस्तीतून ३० ते ३५ महिला पुरुष, तरुणांचा जमाव एकत्र आला, व त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली.
(हेही वाचा – Bangladesh Violence: हिंदूवर अत्याचार सुरूच; २०० कुटुंबांनी घर सोडले)
एमआयडीसी पोलिसांनी या जमावातून स्वतःचा आणि आरोपीचा बचाव करण्यासाठी आंबिवली रेल्वे स्थानकात शिरले. हा जमाव पोलिसांच्या पाठोपाठ आंबिवली रेल्वे स्थानकात शिरला आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली. पोलिसांनी रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिसांच्या चौकीत गेले व त्यांनी दार बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु जमावाने दगडफेक सुरूच ठेवून रेल्वे स्था काचे नुकसान करून पोलीस चौकीचे दार तोडून ओनु लाला इराणी ला पोलिसांच्या (Mumbai Police) तावडीतून सोडवून पळवून लावले. या दगडफेकीत एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकातील अधिकाऱ्यासह पाच जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलीस आणि खडकपाडा पोलिसांनी आंबिवली कडे धाव घेऊन दगडफेक करणाऱ्या जमावाची धरपकड करून ४ जणांना ताब्यात घेतले. दरम्यान खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जनासह २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community