स्वातंत्र्यदिनी देशात सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात असताना चुराचांदपूर येथे बेकायदा शस्त्रप्रदर्शन आयोजित केल्याचे समाेर आले आहे. खळबळ उडालेली असताना त्याची दखल सरकारने घेतली आहे. मणिपूर सरकारने या प्रदर्शनाचा अहवाल चुराचांदपूरचे उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांकडून मागितला आहे. या शस्त्रप्रदर्शनानंतर दोनच दिवसात कुकी आणि मैतेई यांच्यात पुन्हा संघर्ष होऊन ३ युवकांना जीव गमवावा लागला आहे.
गेले ३ महिने मणिपूर हिंसाचाराने धुमसत आहे. अशा स्थितीत पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न उघड झाल्याने राज्यात खळबळ माजली आहे. मे २०२३ मध्ये राज्यात कुकी आणि मैतेई यांच्यात उसळलेला हिंसाचार अजूनही थांबायचे नाव घेत नाही. आतापर्यंत १६० जणांनी या हिंसाचारात प्राण गमावले आहेत.
(हेही वाचा – Chandrayan -3: रात्री दोन वाजता चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्राच्या जवळ)
राज्यात आतापर्यंत १२५० शस्त्रे जप्त
याविषयी राज्याचे संरक्षण सल्लागार कुलदीप सिंह म्हणाले की, ”चुराचांदपूर येथे १५ ऑगस्ट रोजी परवानगी न घेता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बेकायदापणे शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. राज्यात आतापर्यंत १२५० शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. गेल्या ३ महिन्यात हिंसाचाराच्या काळात पोलिसांच्या शस्त्रागारातून मोठ्या प्रमाणात शस्त्रे लुटून नेली आहेत.”
राज्यात सद्यस्थितीत नियमित रूपाने झडतीसत्र राबविले जात असून त्यानुसार शस्त्रे जप्त केली जात आहेत, असेही कुलदीप सिंह यांनी सांगितले.
सरकारकडून चौकशी केली जाईल – मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह
बेकायदा शस्त्रप्रदर्शनाविषयी मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह म्हणाले की, परवानगी न घेता शस्त्र प्रदर्शन कसे भरवले, याची चौकशी सरकारकडून केली जात आहे. ते अधिकृत संचलनाचा भाग नव्हते आणि त्यांनी वेगळ्या रीतीने त्याचे आयोजन केले होते. संवेदनशील भागात पाेलिसांचे झडतीसत्र सुरूच आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community