- प्रतिनिधी
माजी राज्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून सोमवारी सकाळी ४५९० पानांचे दोषारोप पत्र सत्र न्यायालयाच्या विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ अनमोल बिश्नोई सह २९ आरोपी दाखविले. त्यापैकी २६ जणांना अटक करण्यात आलेली असून अनमोल बिश्नोई, झिशान अख्तर आणि शुभम लोणकर यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. या हत्येमागचे कारण आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी ही हत्या अनमोल बिश्नोई याच्या निर्देशावरुन टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आणि वर्चस्व वाढविण्यासाठी करण्यात आल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आलेले आहे. (Baba Siddique Murder Case)
माजी राज्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांच्यावर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी वांद्रे पूर्व येथे जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. मुंबई गुन्हे शाखेने या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक गठीत केले होते. या तपास पथकाने मुंबई, ठाणे, पनवेल, उत्तर प्रदेश तसेच इतर राज्यातून मुख्य हल्लेखोरांसह हत्यार पुरवणारे, हल्लेखोरांना मदत करणारे असे एकूण २६ जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी २६ जणांविरुद्ध ४५९० पानांचे दोषारोप पत्र तयार करण्यात आले आहे. या दोषारोप पत्रात या हत्याप्रकरणात एकूण २९ आरोपी दाखविण्यात आले आहेत. (Baba Siddique Murder Case)
(हेही वाचा – मुंबईतील Taj Hotel बाहेर एकाच क्रमांकाच्या दोन कार; पोलिसांकडून तपास सुरु)
ही हत्या लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ अनमोल लविंदरसिंग बिश्नोई उर्फ भानु उर्फ भाईजी उर्फ एबी भाई याच्या निर्देशावरुन करण्यात आल्याचे दोषारोप पत्रात म्हटले आहे. परदेशात बसलेल्या अनमोल बिश्नोईने या हत्येसाठी मोहम्मद यासिन अख्तर उर्फ सिकंदर उर्फ मोहम्मद जमील उर्फ जिशान अख्तर उर्फ मोहम्मद जसीन उर्फ अख्तर उर्फ जुल्मी उर्फ केही उर्फ जस्सी आणि शुभम रामेश्वर लोणकर उर्फ शुब्बु यांची निवड करून उत्तर प्रदेश, बिहार येथून शूटर पाठवले होते. शुभम लोणकर आणि झिशान अख्तर यांनी शूटर्स यांची राहण्याची सोय, तसेच त्यांना प्रशिक्षण देणे, हत्यार पुरवणे आणि आर्थिक रसद पुरवली होती हे सर्व पुरावे पोलिसांनी गोळा करून दोषारोप पत्रात जोडण्यात आले आहे. या गुन्ह्यात अनमोल बिश्नोई, झिशान अख्तर आणि शुभम लोणकर यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. (Baba Siddique Murder Case)
बाबा सिद्दीकी हत्याकांड हे पाहिजे आरोपी अनमोल लविंदरसिंग बिश्नोई याच्या निर्देशावरुन त्याच्या संघटीत गुन्हेगारी टोळीचे सदस्य असलेल्या अटक व पाहिजे आरोपी यांनी एकत्रितपणे कट रचून त्यांच्या संघटीत गुन्हेगारी टोळीची दहशत व वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याचे दोषारोप पत्रात म्हटले आहे. या गुन्ह्यात मोक्का कायद्यातील कलमांचा अंर्तभाव करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये २६ अटक आरोपी आणि ३ पाहिजे आरोपी यांचे विरुद्ध सबळ पुरावा प्राप्त करुन गुन्हे शाखेकडून विशेष मोक्का न्यायालय, सत्र न्यायालय, येथे ४५९० पानांचे दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरु आहे. (Baba Siddique Murder Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community