बांगलादेशी दहशतवाद्याना पुण्यात आश्रय देणाऱ्या ३ बांगलादेशीना विशेष न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद हबीबुर रहमान हबीब उर्फ राज जेसूब मंडल, हन्नान अन्वर हुसेन खान उर्फ हन्नान बाबुरअली गाझी आणि मोहम्मद अजराली सुभानल्ला उर्फ राजा जेसूब मंडल यांना भारतीय दंड संहिता आणि परदेशी कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार दोषी ठरवले. न्यायालयाने प्रत्येक आरोपीला दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. यापूर्वी, न्यायालयाने ऑक्टोबर २०२३ मध्ये रिपेन हुसैन उर्फ रुबेल आणि मोहम्मद हसन अली मोहम्मद आमेर अली या दोघांना दोषी ठरवले होते. त्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Bangladeshi Infiltrators)
सुरुवातीला, पुणे पोलिसांनी वैध कागदपत्रांशिवाय पुण्यात राहणाऱ्या अनेक बांगलादेशी नागरिकांच्या आणि प्रतिबंधित दहशतवादी संघटना, अल कायदाची आघाडीची संघटना असलेल्या बांगलादेशातील अन्सारुल्ला बांगला टीम (एबीटी) दहशतवाद्यांना प्रोत्साहन आणि मदत केल्याच्या माहितीच्या आधारे मार्च २०१८ मध्ये गुन्हा नोंदवला. पोलिसांनी हबीबला धोबीघाट, भैरोबा नाला, पुणे येथे अटक केली होती आणि त्यानंतर या प्रकरणात एकूण पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती.एनआयआय या केंद्रीय तपास संस्थेने मे २०१८ मध्ये या प्रकरणाचा ताबा घेतला. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांनी भारतात अवैधरित्या घुसखोरी केल्याचे आढळून आले. त्यांनी बनावट कागदपत्रे देऊन काल्पनिक नावाने पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि शिधापत्रिका इत्यादी फसवणूक केली होती. त्यांनी या कागदपत्रांचा वापर भारतीय सिमकार्ड मिळविण्यासाठी, बँक खाती उघडण्यासाठी आणि भारतात नोकरी शोधण्यासाठी केला होता. एनआयएच्या तपासात पुढे असे समोर आले आहे की आरोपींनी समद मिया उर्फ तन्वीर उर्फ सैफुल उर्फ तुषार बिस्वास उर्फ तुसार या प्रमुख सदस्यासह अनेक एबीटी कॅडरला आश्रय दिला आणि निधी दिला होता, या प्रकरणात आरोपीना दोषी ठरवून त्यांना विशेष न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. (Bangladeshi Infiltrators)
हेही पहा-