बोगस कागदपत्राच्या आधारे कर्जावर घेतलेली ब्रँडेड महागडी वाहने (Expensive vehicles) परराज्यात विक्री करून बँकांची कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या टोळीने परराज्यात विकेलेली १६ ब्रँडेड मोटार कार जप्त करण्यात आलेल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची किंमत ७ कोटी ३० लाख असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे (Dutta Nalawade) यांनी दिली आहे. या सात जणांच्या टोळीतील ४ जणांवर यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल असून एकाला यापूर्वी अशाच एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती अशी माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. (Vehicle loan)
रविंद्र दिनानाथ गिरकर उर्फ परदिप रविंदर शर्मा (४७), मनिष सुभाष शर्मा (३९),सय्यद नावेद सय्यद जुल्फीकार अली (५२), दानिश रफिक खान (३२), साईनाथ व्यंकटेश गंजी (२९), यशकुमार सुनिल कुमार जैन (३३) आणि इमान अब्दुल वाहिद खान उर्फ देवा (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. रवींद्र गिरकर उर्फ प्रदीप शर्मा हा टोळीचा प्रमुख आहे. विक्रोळी पार्कसाईड पोलीस ठाण्यात दोन वर्षापूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा फायनांशिअल कंपनीचे कर्मचारी कल्पक म्हात्रे यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत परदीप शर्मा नावाच्या व्यक्तीने महिंद्रा अँड महिंद्रा फायनांशिअल कंपनीला बोगस कागदपत्रे सादर करून ‘महिंद्रा थार’ ही मोटारीवर कर्ज (Vehicle loan) घेतले होते, त्याने बँकेला सादर केलेले सर्व कागदपत्रे बोगस असून तो व्यक्ती मिळून येत नसल्याचे तक्रारीत म्हटले होते.
(हेही वाचा – Chief Minister Medical Assistance Cell च्या तत्परतेने पाच रुग्णांना तातडीची मदत)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीचा एक भाग म्हणून त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आलिशान आणि महागड्या गाड्या खरेदी केल्याचा आरोप आहे, या टोळीने वेगवेगळ्या राज्यातील व्यावसायिकांच्या नावावर त्यांच्या जीएसटी क्रमांकांचा गैरवापर करून आणि बनावट कागदपत्रे तयार करून कर्ज घेतले होते, आणि लक्झरी कार राज्याच्या बाहेर विकण्यात आल्या होत्या, मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ३ च्या पथकाने बीएमडब्ल्यू (BMW), फॉर्च्युनर (Fortuner) आणि स्कॉर्पिओ (Scorpio) सारख्या लक्झरी मॉडेल्ससह १६ वाहने देखील जप्त केली आहेत. संशयितांना दिल्ली, मध्य प्रदेश, अहमदाबाद आणि मुंबईसह विविध शहरांमधून अटक करण्यात आली, जप्त करण्यात आलेल्या लक्झरी कारची किंमत ७ कोटी ३० लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे (Dutta Nalawade) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, सपोनि. अमोल माळी, समीर मुजावर, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित शिरसाठ, गोरेगावकर आणि पथक यांनी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community