इसिसच्या पुणे मॉड्युल प्रकरणात फरार ४ संशयित दहशतवाद्यावर प्रत्येकी ३ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. या चौघांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी ३ लाख रुपयांचे रोख बक्षीस एनआयए कडून जाहीर करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याचे एनआयए ने म्हटले आहे.
मोहम्मद शाहनवाज शफीउज्जमा आलम उर्फ शफी उज्जामा उर्फ अब्दुल्ला, फैयाज शेख (डायपरवाला) ,लियाकत खान आणि रिझवान अब्दुल हाजी अली असे बक्षिस जाहीर करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. चौघांपैकी फैयाज शेख (डायपरवाला) आणि लियाकत खान हे दोन आरोपी कारवाई पूर्वीच ओमानला पळून गेले असल्याची माहिती एनआयए ने दिली असून त्यांना भारतात आणण्यासाठी (प्रत्यार्पण) एनआयआय कायदेशीर मार्गाचा पाठपुरावा करीत असून नोडल एजन्सी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला या प्रकरणाशी संबंधित सर्व तपशील देण्यात आले असल्याचे एनआयए म्हटले आहे. एनआयए ने या चौघांना फरार घोषित केले असून त्यांच्यावर प्रत्येकी ३लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून त्यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी तीन लाख रुपये रोख देण्यात येईल आणि माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे एनआयएने जाहीर केले आहे.
एनआयए मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई ,पुणे आणि ठाणे परिसरातून काही संशयितांना अटक करून इसिस या दहशतवादी संघटनेचे पुणे मॉड्युलचा पर्दाफाश केला होता. अटक करण्यात आलेल्या मध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकीब नाचन याच्या मुलाचा आणि एका नातलगाचा समावेश आहे. एनआयए च्या तपासात इसिस चे हे मॉड्युल मुंबई पुण्यात मोठा घातपापाताचा कट रचत होते. दरम्यान पुण्यातील कोंढवा येथे राहणारा फैय्याज शेखच्या कोंढवा येथील डायपरच्या दुकानात इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) बनवणे, तयार करणे आणि त्याची चाचणी करणे यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सर्व आरोपींचा सहभाग होता.
पुण्यातील कोंढवा परिसरात डायपरचे दुकान असल्यामुळे डायपरवाला म्हणून ओळखले जाणारा फैयाज शेख हा या कटाचा मुख्य सूत्रधार होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, शमील नाचन आणि अकीफ नाचन हे दोन अन्य आरोपीसह फैयाज शेख यांच्या घरी एक दिवस थांबले होते, त्यांनी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी स्फोटक साहित्य घेऊन पुण्यात आले होते . लियाकत खान हा देखील पुण्याचा रहिवासी असून फैयाज शेखशी त्याचे संबंध आहेत. तोही या कार्यशाळेत सहभागी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
फैयाज शेख आणि लियाकत खान हे दोघेही कट्टरपंथी बनले होते आणि या मॉड्युलचा मास्टरमाईंड इम्रान खानच्या सूचनेनुसार त्यांनी कार्यशाळेची व्यवस्था केली आणि इतर संशयितांना त्यांनी आमंत्रित केले होते, असे सूत्रांनी सांगितले. लियाकत खानची पत्नी आणि मुलगी २ मे २०२२ रोजी ओमानला रवाना झाली, तर लियाकत खान स्वत: १२ ऑगस्ट २०२२ रोजी निघून गेला. त्याचप्रमाणे फैयाज शेखची पत्नी आणि दोन मुले १२ जून २०२२ रोजी ओमानला रवाना झाली आणि १५ जुलै२०२२ रोजी त्यांनी त्याचा पाठपुरावा केला होता.
शफीउज्जमा आलम हा इसिस रतलाम मॉड्यूलचा अल-सुफा मास्टरमाइंड इम्रान आणि युनूससोबत कोंढवा येथील मीठानगर येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. घराची झडती घेतली असता पोलिसांच्या ताब्यातून तो पळून जाण्यात यशस्वी झाला आणि सध्या तो फरार आहे.