कोरोना काळात बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात संशयित आरोपी असणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स जारी करून ११ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. पेडणेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्यानंतर बुधवार पर्यंत पेडणेकर यांच्यावर कारवाई न करण्याचे तोंडी आदेश न्यायालयाने दिले होते.
कोरोना काळात बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह वेदांत इन्फोटेक कंपनीच्या कंत्राटदार आणि एका माजी मनपा आयुक्त यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी पेडणेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, २९ ऑगस्ट रोजी न्यायालयाने किशोरी पेडणेकर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत बुधवार पर्यत त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करण्याच्या आदेश दिला होता. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी पेडणेकर यांना समन्स पाठवून ११ सप्टेंबर (सोमवार) रोजी तपास कामी चौकशीला हजर राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
(हेही वाचा-दिवाळखोरीतून बाहेर पाडण्यासाठी Pakistan विकणार सरकारी कंपन्या)
न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलविण्यात आल्यामुळे पेडणेकर यांना अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ४ ऑगस्ट रोजी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे,आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) आणि माजी महापालिका उपआयुक्त (खरेदी),खाजगी कंत्राटदार वेदांत इनोटेक यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला होता.
वेदांत इन्फोटेक यांनी कथितपणे मुंबई महानगरपालिकेला ६ हजार ७१९ रुपये प्रति बॉडी बॅग पुरवल्या होत्या, जे त्याच कालावधीत इतर सरकारी अधिकारी किंवा खाजगी रुग्णालयांकडून आकारल्या गेलेल्या तिप्पट (प्रत्येकी १५०० रुपये) जास्त होत्या.
Join Our WhatsApp Community