लग्नाच्या रेशीमगाठी स्वर्गात जोडल्या गेल्या असल्या तरी त्या इथं पुन्हा जुळाव्या लागतात आणि शोधाव्या लागतात. मग शोधताना अनेक मार्गांचा अवलंब करावा लागतो. सध्या वधू-वर सूचक मंडळ, तसेच मॅट्रोमिनअल साईट्स या अधिक झाल्या आहेत. यावर लग्नाच्या रेशीमगाठी जुळतात खरं, तितक्याचं फसवणूकीच्या घटनाही अधिक घडतं असतात. आता सोलापूरातील बार्शी शहरात शेकडो लग्नाळू तरुणांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुणांकडून हजारो रुपयांची फी घेऊन वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. पण या मेळाव्यात वधूच दिसली नाही. त्यामुळे संतप्त लग्नाळू तरुणांनी आणि पालकांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून संबंधित वधू वर मंडळ चालक, महिला आणि एजंटला ताब्यात घेतलं आहे.
नक्की काय घडलं?
बार्शीतल्या एका मंगल कार्यालयात सुशिक्षित तरुणांचा वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातील मुलगी पसंत पडताच लगेच लग्न लावून देण्याचं आश्वासन संबंधित मंडळाकडून देण्यात आलं होत. यासाठी नोंदणी फी म्हणून प्रत्येकी हजार रुपये आणि डिपॉझिट म्हणून तीन ते दहा हजार रुपये घेण्यात आले होते. पण या मेळाव्यात गेल्यानंतर लग्नाळू तरुणांना वधूच दाखवण्यात आली नाही. यामुळे नातेवाईकांना संशय येऊ लागला. वधू दाखवली नसल्यामुळे मेळावा चालकाला वर मंडळींनी धारेवर धरलं.
आजपर्यंत एकही लग्न मंडळाने लावून दिलेले नाही
मेळाव्यात फसवणूक होत असल्याचं समजताच संबंधित लग्नाळू तरुण आणि नातेवाईकांनी बार्शी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी संबंधित वधू-वर मंडळाचे चालक, महिला आणि एजंटला ताब्यत घेतलं. यामुळे कथित वधू-वर मंडळाचं बनावट रॅकेट उघड झालं. हे मंडळ नोंदणीकृत नसून आजपर्यंत एकही लग्न मंडळानं लावून दिलेलं नाही. फक्त आश्वासनं दिली आहेत, असं सर्व काही पोलिसांच्या तपासातून उघड झालं.
(हेही वाचा – नायगावमध्ये लोकलचा विचित्र अपघात; मोटरमन गंभीर जखमी )
Join Our WhatsApp Community