लाचखोर पोलीस निरीक्षकाला फिल्मी स्टाईलने पकडले; लाखोंची रोकड आणि दागिने जप्त

133

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच 107 नुसार प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन 75 हजार रुपये लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकाला छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. गणेश शेषेराव शिंदे असे लाच घेताना पकडलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी 14 एप्रिल रोजी केली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत 51 वर्षाच्या व्यक्तीने छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे तक्रार केली होती. गणेश शेषेराव शिंदे हे कदीम जालना पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. त्यामुळे गणेश शिंदे यांनी तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई कलम 110 ऐवजी कलम 107 प्रमाणे करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी एक लाख रुपयाची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 75 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर एसीबीकडे तक्रार केली.

(हेही वाचा उत्तर प्रदेश: कुख्यात गॅंगस्टरच्या मुलाचा स्पेशल टास्ककडून एन्काऊंटर)

एसबीच्या पथकाने पडताळणी केली असता गणेश शिंदे याने एक लाख रुपये लाचेची मागणी करुन 75 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने बुधवारी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर शिंदे याला एसबीच्या पथकाचा संशय आल्याने तो लाचेच्या रकमेसह स्वतःच्या खाजगी वाहनातून पळू गेला. पथकाने सुमारे तीन किलोमीटर पाठलाग करून गणेश शिंदे याला पकडले. गणेश शिंदे याने लाचेची रक्कम पाठलागाच्या दरम्यान फेकून देऊन पुरावा नष्ट केला. पथकाने पंचाच्या समोर आरोपीच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये रोख 9 लाख 41 हजार 590 रुपये व 25 तोळे (250 ग्रॅम) सोने मिळाले. आरोपी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे याच्यावर कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.