Kolhapur : निवडणूक दक्षता अधिकारी भासवून व्यावसायिकाला लुटले; ५ जणांच्या टोळीला अटक

35
Kolhapur : निवडणूक दक्षता अधिकारी भासवून व्यावसायिकाला लुटले; ५ जणांच्या टोळीला अटक
Kolhapur : निवडणूक दक्षता अधिकारी भासवून व्यावसायिकाला लुटले; ५ जणांच्या टोळीला अटक

तावडे हॉटेल, कोल्हापूर (Kolhapur) येथे निवडणूक दक्षता (व्हिजीलन्स) अधिकारी (election vigilance officer) भासवून एका व्यावसायिकाला २५ लाख ५० हजार रुपयांना लुटणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक करुन गांधीनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४८०/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०४, ३१८ [४], ३१९ [२], ३१० [२], ३ [५] प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तावडे हॉटेलच्या हायवे ब्रिजवर व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हारणे, रा. बागल चौक, कोल्हापूर यांना ५ लोकांच्या टोळीने “निवडणूक व्हिजीलन्स अधिकारी आहोत, आचार संहिता सुरु असून तुम्ही रोख रक्कम जवळ ठेवू शकत नाही,” असे सांगुन फिर्यादीस गाडीमध्ये बसवून सरनोबतवाडी, ता. करवीर येथे घेवून जाऊन त्यांच्याकडील २५ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट काढून घेतले होते.

(हेही वाचा – National Epilepsy Day : राष्ट्रीय अपस्मार दिन का पाळला जातो?)

सध्या विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) ची आचार संहिता लागू असून त्यामध्ये निवडणूक व्हिजीलन्स अधिकारी असल्याचा बनाव करुन रक्कम लुटल्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी तात्काळ तपासणी करण्याच्या सुचना तपासणी टीमला दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील ६ तपास पथके नेमून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.

गाडीसह आरोपी ताब्यात

गोपनीय बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय किरणगी व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. तसेच ते गुन्हा केल्यानंतर गोवा येथे गेले असल्याचे समजले. त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक जालींदर जाधव व त्यांचे पथक तात्काळ गोवा येथे रवाना झाले. तपासा दरम्यान नमुद आरोपी गोवा येथुन कोल्हापूरच्या दिशेने परत येत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. चेतन मसुटगे व पथकाने राधानगरी ते कोल्हापूर रोडवर पुईखडी या ठिकाणी १] संजय महावीर किरणगे, वय ४२ वर्षे, २] अभिषेक शशिकांत लगारे, वय २४ वर्षे, ३] विजय तुकाराम खांडेकर, वय २८ वर्षे, सर्व रा. कोल्हापूर यांना गुन्हा करतेवेळी वापरलेल्या टाटा हॅरियर व निसान गाडीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात आणखी २ आरोपी असून त्यांची नावे स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव व हर्षद खरात असून ते सध्या कोठे आहेत याबाबत माहिती नसल्याचे सांगीतले.

तसेच हर्षद खरात व स्वप्निल उर्फ लाला तानाजी जाधव यांना सदर व्यावसायिक हा कर्नाटक येथुन परत कोल्हापूर येथे रक्कम घेवून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा कट रचल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या ३ आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली २५ लाख रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेल्या टाटा हॅरियर गाडी क्र. KA-३३-Z-५५५० किंमत २० लाख रुपये व निसान मॅग्नेट गाडी क्र. MH-०९-GA-६२५९ किंमत १० लाख रुपये असा एकूण ५५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे. २ आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल गांधीनगर पोलीस ठाण्यास जमा केला असून गुन्ह्याचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव करीत आहेत. (Kolhapur)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.