बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेच्या भीतीने मुलुंडमध्ये राहणाऱ्या ४४ वर्षीय सीएने (चार्टट अकाउटंट) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या ठिकाणी एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला असून इगतपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
चिराग वारीया असे या सीएचे नाव आहे. मुलुंड पश्चिम येथे राहणारे चिराग वारीया यांनी भांडुप येथे राहणाऱ्या एका महिले विरोधात २०२२ मध्ये मुलुंड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून या महिलेला अटक करण्यात आली होती. जामिनावर बाहेर आलेल्या या महिलेने चिराग यांच्यावर सूड घेण्यासाठी भांडुप पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप करून तक्रार दाखल केली होती.
भांडुप पोलिसांनी दोन आठवड्यापूर्वी या महिलेच्या तक्रारीवरून चिराग वारीया यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, या गुन्ह्यानंतर भांडुप पोलिसांनी चिराग याला फोन करून पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले होते. मी दुसऱ्या दिवशी येतो असे सांगून चिराग हा शनिवारी आपल्या वाहन चालकासह इगतपुरी येथे आले. त्यांनी तेथील एका हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. रविवारी दुपारी चिराग हॉटेलच्या खोलीत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community