डोंबिवलीतील एका केबल व्यावसायिकाला ‘हनीट्रॅप’मध्ये अडकवून रिव्हॉल्वरसह साडेचार लाखांच्या ऐवजासह फरार झालेल्या महिलेला तिच्या एका साथीदारासह गोव्यातून अटक करण्यात आली आहे. या महिलेने अनेक पुरुषांना हनीट्रॅपमध्ये अडकवून लुटल्याचे समोर आले आहे.
समृद्धी खडपकर (२९), विलेंडर डीकोस्टा (३८) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. समृद्धी ही वांद्रे पूर्व निर्मल नगर तर डिकोस्टा हा गोवा येथे राहणारा आहे. तक्रारदार हे डोंबिवली पूर्वेत राहणारे केबल व्यावसायिक आहेत. तक्रारदाराला डिसेंबर महिन्यात फेसबुकवर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. तक्रारदाराने कुठलीही खातरजमा न करता केवळ महिलेचा फोटो बघून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली.
(हेही वाचा नवीन वर्षे चीनसाठी खडतर; आयएमएफने काय म्हटले?)
…आणि महिला पळाली
त्यानंतर दोघांमध्ये फेसबुक मेसेंजरवर मेसेजचा सिलसिला सुरू झाला. केबल ऑपरेटर असणाऱ्या तक्रारदाराने या महिलेला भेटण्यासाठी डोंबिवली पूर्व येथे एका हॉटेलमध्ये बोलावले, त्याठिकाणी भेट झाल्यावर दुसऱ्या दिवशी दोघांनी लॉजवर जाण्याचे नक्की करून बदलापूर रोड खोणी या ठिकाणी कोहिनूर हॉटेल येथे एक खोली बुक केली. हॉटेलच्या खोलीत गेल्यावर तक्रारदार याने स्वतः जवळील काडतुसांनी भरलेले परवाना असलेले रिव्हॉल्वर आणि अंगावरील दागिने काढून एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले होते. तक्रारदार हे हॉटेलच्या खोलीत असलेल्या बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेले व काही वेळाने बाहेर आले असता त्यांना खोलीत महिला आणि रिव्हॉल्वर, दागिन्यांची बॅग दिसली नाही. त्यांनी हॉटेलच्या मॅनेजरकडे याबाबत चौकशी केली असता महिला निघून गेली असे सांगण्यात आले.
गोव्यात केली अटक
आपली फसवणूक करून महिलेने लुटल्याचे लक्षात येताच केबल व्यावसायिक यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेचा शोध सुरू केला. ही महिला गोव्यात असल्याचे कळताच पोलिसांनी गोव्यात जाऊन तिचा शोध घेऊन तिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली. या दोघांजवळून पोलिसांनी चोरलेले रिव्हॉल्वर आणि दागिने जप्त केले आहेत. तिच्याकडे केलेल्या चौकशीत महिलेने यापूर्वी याप्रकारे अनेक पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले, त्यानंतर एका हॉटेलच्या खोलीत आणून त्यांना शितपेयात गुंगीचे औषध देऊन त्यांना लुटल्याची माहिती पोलिसांना दिली.