ऑल आउट ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतलेल्या तरुणाला पोलीस ठाण्यात आणून चौकशी करताना मुलाच्या वडिलांचा पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी रात्री कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात घडली. हे प्रकरण तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सोपविण्यात आले आहे. या मुलाच्या वडिलांचा मृत्यु नेमका कशामुळे झाला याचा तपास सीआयडी करीत असून या प्रकरणात कोळसेवाडी पोलीस संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
नेमके काय घडले?
दीपक संभाजी भंगारदिवे (६३) असे पोलीस ठाण्यात संशयास्पद रित्या मृत्यु झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व येथे असलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्याकडून शुक्रवारी रात्री परिसरात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ ही कारवाई राबविण्यात आली होती. या कारवाईच्या दरम्यान पोलिसांनी प्रशिक भिंगारदिवे (२४) याला संशयावरून ताब्यात घेऊन चौकशीकामी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आणले गेले होते.
मुलाला पोलीस पकडून घेऊन गेले म्हणून प्रशिक याचे ६३ वर्षाचे वडील दीपक भंगारदिवे हे रात्री कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आले होते. मुलाला का आणले? याचा जाब ते पोलिसांना विचारत होते. प्रशिक याच्याकडे चौकशी करीत असताना पोलिसांनी त्याचे वडील दीपक यांना ठाणे अंमलदार कक्षात बसवले असता त्या ठिकाणी ते फिट येऊन पडले, त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले असल्याचे पोलीस सांगत आहे. तसेच या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेले असल्याचा दावा कोळसेवाडी पोलिसांनी केलेला असून हे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सीआयडीकडे सोपविण्यात आलेले असल्याची माहिती संबंधित पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.
जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांवर गंभीर आरोप
दीपक भंगारदिवे यांचा मुलगा प्रशिक याच्याकडे विचारपूस सुरू असताना दीपक भंगारदिवे हे त्याच्या मोबाईल फोन मधून त्याचा व्हिडीओ काढून पोलिसांसोबत हुज्जत घालत होते असा देखील आरोप पोलिसांकडून करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद असून कोळसेवाडी पोलिसांच्या मारहाणीत दीपक भंगारदिवे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर ट्विट करून केला आहे. दीपक भंगारदिवे हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून ते मुलाला सोडवण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांच्या सोबत वाद घालून त्यांना पोलीस ठाण्यातच लाथा बुक्यानी मारहाण केली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आलेले असून पोलीस ठाण्यातील सर्व सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सीआयडीकडे सोपविण्यात आली असून या घटनेचा तपास सीआयडी करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिली.
Join Our WhatsApp Community