आलिशान मोटारी, पंचतारांकित हॉटेलात उठबैस असणाऱ्या तीन तोतया आयकर अधिकाऱ्यांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांजवळून एक आलिशान मोटार आणि भारतीय चलनातील बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहे. हे तिघे राज्यातील व्यावसायिकांना आयकर अधिकारी असल्याचे सांगून छाप्यात जप्त केलेल्या नोटा देण्याच्या नावाखाली ‘भारतीय बच्चोका बँक’ लिहिलेल्या खेळण्यातील नोटा देऊन व्यावसायिकांना लाखो रुपयांचा गंडा घालत होते. माटुंग्यात नुकताच दाखल झालेल्या एका गुन्ह्यात या तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिली.
( हेही वाचा : T-20 World Cup 2022 : विश्वचषकात मोठा ट्वीस्ट! भारत सेमीफायनलमध्ये; दक्षिण आफ्रिका बाहेर तर पाकिस्तानला अजूनही संधी… )
देवराव भाऊराव हिवराळे (३५), रविकांत जर्नादन हिवराळे (३६)आणि योगेश वासुदेव हिवराळे (३२) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे बुलढाणा जिल्ह्यात राहणारे असून या तिघांवर नाशिक, सातारा, बुलढाणा आणि मुंबईत फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असून यापूर्वी त्यांना अटक देखील करण्यात आली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी दिली
पुण्यातील व्यावसायिक रामदास बल्लाळ यांनी दोन दिवसांपूर्वी माटुंगा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या तिघांनी बल्लाळ यांना आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडे छाप्यात जप्त केलेले ४० लाख रुपये आहे, व ते त्यांना अर्ध्या किंमतीत द्यायचे असल्याचे सांगून बल्लाळ यांचा विश्वास संपादन केला होता. बल्लाळ यांना कधी मर्सडीज बेंज, कधी फॉरचूनर, तर कधी क्रेटा या आलिशान मोटारीत सैर करवून त्यांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात आणून त्यांना ते तिघे खरोखर आयकर अधिकारी असल्याचे त्यांना भासवले.
व्यावसायिक बल्लाळ यांना आपल्यावर विश्वास बसला असल्याचे कळताच त्यांनी नोटांची देवाण घेवाण करण्यासाठी दादर येथील प्रीतम या हॉटेलमध्ये २०लाख रुपये घेऊन बोलावले. या तिघांनी हॉटेलच्या खोलीत बल्लाळ यांना पैशांनी भरलेली बॅग देऊन त्यात ४० लाख रुपये असल्याचे सांगत बल्लाळ यांच्याकडून बदल्यात २० लाख रुपयांची बॅग घेऊन तेथून रफूचक्कर झाले. हे तिघे तेथून निघून गेल्यावर बल्लाळ यांनी बॅग उघडून रोकड तपासली असता त्या ४० लाखाच्या बॅगेत खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या ५०० रुपयांच्या नोटा परंतु त्या नोटांवर ‘भारतीय रिजर्व बँक’ ऐवजी ‘भारतीय बच्चोका बँक’ असे लिहिलेल्या नोटा असल्याचे कळताच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले अशी माहिती बल्लाळ यांनी आपल्या तक्रारीत दिली.
परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, सहायक पोलीस आयुक्त कल्पना गाडेकर, माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,दिपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक, राहुल गौड, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप-निरीक्षक प्रशांत कांबळे, सहायक फौजदार जयेंद्र सुर्वे आणि पथक यांनी तांत्रिकरित्या तपास करून तिघांना मुंबईतील एका हॉटेलमधून ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून क्रेटा ही मोटार हस्तगत करण्यात आली आहे. या तिघांनी फसवणूक करून घेतलेली रक्कम कुठे ठेवली याचा शोध सुरू असून लवकरच फसवणुकीची रक्कम हस्तगत करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कांबळे यांनी दिली.
या तिघांकडे असणाऱ्या भारतीय चलनातील नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या या नोटा चित्रपटात वापरण्यासाठी तयार केल्या जातात, या दिसायला हुबेहुब भारतीय चलनातील नोटा प्रमाणे दिसतात. परंतु या नोटांचा कागद हलक्या दर्जाचा असतो व नोटांवर भारतीय रिजर्व बँक ऐवजी भारतीय बच्चोका बँक असे लिहलेले असते अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अटक करण्यात आलेले हे तिघे चित्रपट निर्माते असल्याचे सांगून या नोटा मिळवत होते व या नोटांचा गैरवापर करून व्यावसायिकांची फसवणूक करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community