मुंबईतील बहुचर्चित जया शेट्टी (Jaya Shetty) हत्याकांड प्रकरणी कुख्यात डॉन छोटा राजनला दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला मकोका (महाराष्ट्र संघटीत अपराध नियंत्रण अधिनियम) अंतर्गत न्या. ए. एम.पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि १६ लाखांचा दंड केला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींना यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा झाली होती. २००१ मधील हत्याकांड प्रकरणाचा निकाल तब्बल २३ वर्षांनी आला आहे. पत्रकार जे.डे. हत्याकांडानंतर छोटा राजनला (Chhota Rajan) दुसरी जन्मठेप मिळाली आहे.
(हेही वाचा – आमदार संतोष बांगरांविषयी पोस्ट केल्यामुळे उबाठाच्या Ayodhya Pol सापडल्या अडचणीत)
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांची हत्या ४ मे २००१ रोजी झाली होती. जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे ग्रँट रोडमधील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. राजन गँगने रवी पुजारीमार्फत जया शेट्टीकडून ५० कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना २०१३ मध्येच न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. आता छोटा राजन यालाही शिक्षा झाली आहे.
इंडिनेशियामध्ये केली होती अटक
छोटा राजन सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात (Tihar Jail) आहे. त्याला इंडिनेशियामध्ये अटक करुन ऑक्टोबर २०१५ मध्ये भारतात आणले गेले. तेव्हापासून तो नवी दिल्लीतील तिहारमधील जेल नंबर २ मध्ये आहे. हा सेल उच्च सुरक्षा असणारा आहे. कधीकाळी दाऊद इब्राहीमचा (Dawood Ibrahim) जवळचा असणारा छोटा राजन १९९३ मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊद गँगपासून वेगळा झाला होता. त्यानंतर दोन्ही गटात गँगवार होत राहिले होते. छोटा राजनचे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. त्याचा जन्म १३ जानेवारी १९६० रोजी झाला. गेल्या वर्षी छोटा राजन प्रसिद्धीच्या झोतात आला होता. चित्रपट निर्माते हंसल मेहता आणि ‘स्कूप’ या वेब सिरीजचे निर्माते मॅचबॉक्स शॉट्स एलएलपीच्या मालकांविरुद्ध त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या दाव्यात राजनने (Chhota Rajan) चित्रपट निर्मात्याने आपला फोटो आणि आवाज वापरल्याबद्दल आक्षेप घेतला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community