दाऊदच्या ‘या’ विश्वासू साथीदाराने तयार केली स्वतःची टोळी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार आणि उजवा हात समजला जाणारा शकील बाबू मोहिद्दीन शेख उर्फ छोटा शकील याने मुंबईत स्वतःची एक वेगळी टोळी तयार केली आहे, या टोळीने मुंबईतील व्यापारी, व्यावसायिकांना लक्ष्य करून वसुली केल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका खंडणीच्या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.

छोटा शकील १९९९ पासून एक वेगळी टोळी चालवत होता

वर्सोवा पोलिस ठाण्यात शहरातील एका व्यापाऱ्याने दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने छोटा शकीलचा साडू सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट रियाज भाटीसह पाच जणांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी न्यायालयात आरोपी विरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. एक हजार पानांच्या आरोपपत्रात सुमारे २५ साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींविरुद्ध इतर पुरावे समाविष्ट आहेत. खंडणी विरोधी पथकाने दावा केला आहे की, छोटा शकील १९९९ पासून एक वेगळी टोळी चालवत आहे.

तक्रारदाराने गेल्यावर्षी वर्सोवा पोलिसांकडे धाव घेतलेली  

सलीम फ्रूट आणि रियाज भाटी यांनी साडेसात लाखांची खंडणी आणि सुमारे ३० लाख किमतीची तक्रारदार यांची रेंज रोव्हर जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करून तक्रारदार यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वर्सोवा पोलिसांकडे धाव घेतली होती. या प्रकरणाची वर्सोवा पोलिसांत नोंद करण्यात आली आणि नंतर तो गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला होता. रियाज भाटी आणि सलीम फ्रूट व्यतिरिक्त, पोलिसांनी या प्रकरणात अजय गोसालिया, फिरोज शेख, समीर खान, अमजद रेडकर, जावेद खान उर्फ ​​पापा पठाण यांना आरोपी केले आहे. आरोपपत्रात, खंडणी विरोधी पथकाने दावा केला आहे की तपासात हे सात जण शकीलच्या टोळीचे सक्रिय सदस्य आहेत.

सात जण दाऊद टोळीचे जुने सदस्य 

मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की, शकीलची स्वतःची टोळी १९९९ सालापासून कार्यरत आहे आणि अनेक नवीन तसेच जुने सदस्य त्यात आहेत, असे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले सात जण दाऊद टोळीचे जुने सदस्य असून त्यांनी अनेक वर्षांपासून एकत्र काम केल्याचा दावा केला जात आहे. आरोपपत्रात असाही दावा केला आहे की, हे सात सक्रिय सदस्य आहेत आणि ते लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here