Chinese Manja : बंदी असून देखील चायनीज मांजाची विक्री सुरू, पाच वर्षात मांजाचे सहा बळी 

232
Chinese Manja : बंदी असून देखील चायनीज मांजाची विक्री सुरू, पाच वर्षात मांजाचे सहा बळी 
Chinese Manja : बंदी असून देखील चायनीज मांजाची विक्री सुरू, पाच वर्षात मांजाचे सहा बळी 
दरवर्षी बळी घेणाऱ्या चायनीज मांजावर (Chinese Manja) केंद्र शासनाने बंदी घालूनही मुंबईसह संपूर्ण राज्यात चायनीज मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. या चायनीज मांजाने मागील पाच वर्षात एकट्या मुंबईत ६ जणांचा बळी घेतला असून दोन जण या चायनीज मांजामुळे जखमी झाले आहेत. मनुष्यच नाही तर पक्ष्यांसाठीही हा मांजा मोठ्या प्रमाणात घातक ठरत आहे, या चायनीज मांजामुळे दरवर्षी शेकडो पक्षी मृत होतात तर तेवढ्याच संख्येने पक्षी जखमी देखील होत आहेत. पतंगाच्या मांजामुळे बळी जाणाऱ्यांना जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.
मकर संक्रांतीच्या महिनाभर अगोदर मुंबईसह राज्यभर पतंग (Chinese Manja) उडविण्याचा सिझन सुरू होतो. शहरात इमारतीच्या गच्चीवरून पतंग उडविण्याचे तसेच दुसऱ्यांची पतंग कापण्याची स्पर्धा सुरू होते. इतरांची पतंग कापण्यासाठी अनेकजण चायनीज मांजा (नायलॉन) चा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. पतंग कापल्यानंतर पतंगाचा मांजा हा आकाशात उडणारे पक्षी तसेच रस्त्यावर चालणारे पादचारी, दुचाकीस्वार यांना घातक ठरत आहे. या कारणावरून केंद्र शासनाने चायनीज मांजावर बंदी आणली आहे, त्यानंतर ही मुंबईसह राज्यभरात या मांजाला मोठी मागणी असल्यामुळे पतंग विक्रेत्यांकडून चायनीज मांजा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे.
मुंबई शहरात मस्जिद बंदर, वांद्रे पश्चिम, कुर्ला पूर्व पश्चिम, बोरिवली या ठिकाणी पतंग आणि मांजाचे घाऊक व्यापारी मोठया प्रमाणात पतंग आणि चायनीज मांजाची विक्री करीत आहे. या घाऊक व्यापाऱ्यांकडून मुंबईतील किरकोळ व्यापारी चायनीज मांजा खरेदी करून त्यांची विक्री करीत आहे, केंद्र शासनाने बंदी आणलेल्या चायनीज मांजा विक्रेत्यांवर अद्याप पर्यंत पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे चायनीज मांजाची विक्री सर्रासपणे होत आहे.
चायनीज मांजाने ६ जणांचा बळी घेतला..
२४ डिसेंबर २०२३ रविवारी रोजी दुपारी मुंबईतील वाकोला उड्डाण पुलावर चायनीज मांजाने समीर जाधव या पोलीस अंमलदाराचा बळी घेतला आहे. समीर जाधाव हे दुपारी ४ च्या सुमारास दिंडोशी पोलीस ठाण्यातील कर्तव्य संपवून वरळी बीबीडी येथे मोटारसायकल वरून घरी जात असताना अचानक वाकोला पुलावर पतंगाच्या मांजाने जाधव यांचा गळा चिरला आणि ते जागीच कोसळून त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी पतंग उडविणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
१५ जानेवारी २०२३ रोजी भिवंडी येथून उल्हासनगर येथे दुचाकीवर निघालेल्या ४७ वर्षीय व्यक्तीला चायनीज मांजामुळे जीव गमवावा लागला. बंदी असलेल्या नायलॉन पतंगाच्या मांजांमुळे या व्यक्तीचा गळा चिरून त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
याप्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

(हेही वाचा-Ajit Pawar: अजित पवार यांच्याकडून मांजरी बुद्रुक येथील विविध विकासकामांची पाहणी)

१६ जानेवारी २०२३ रोजी रविवारी पालघर जिल्ह्यातील मनोरजवळ मोटारीच्या सनरुफ मधून डोके बाहेर काढून उभा असलेल्या आठ वर्षाच्या मुलाच्या गळ्याभोवती मांजा गुंडाळला गेल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला होता. १६ जानेवारी २०२१ मध्ये वरळी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी हे मोटारसायकल वरून जे जे उड्डाणपुलावरून मुंबईच्या दिशेने जात असताना पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला अडकून त्यांचा गळा कापला गेला व त्यांचा पुलावर अपघात झाला होता. या अपघातात गवळी हे बचावले मात्र मांज्यामुळे त्याचा गळा चिरला गेला व त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ४ महिने गवळी यांना खाता येत नव्हते किंवा बोलता येत नव्हते.
१९ जानेवारी २०२१ रोजी एका इंग्रजी दैनिकाचे पत्रकार प्रेस्ली थॉमस पश्चिम द्रुतगती महामार्गावर चायनीज मांजामुळे जखमी झाले होते, मोटारसायकल वर असणारे प्रेस्ली यांच्या नाकाला मांजामुळे मोठी जखम झाली होती. मोटारसायकलचा वेग कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती.
१६ जानेवारी २०१९ रोजी रात्रीच्या वेळी वडाळा येथे राहणारे गीतेश पठारे (२९) हे पतंगाच्या तुटलेल्या मांजापासून स्वतःचा बचाव करताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला व त्यात त्यांचा मृत्यु झाला. गीतेश पठारे हे इंजिनियर होते व एमआयडीसी-सीप्झ येथून ते कामावरून घरी परतत असताना विलेपार्ले पश्चिम द्रुतगती महामार्गावर ही दुर्घटना घडली होती.
१२ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मुंबई पोलिसांनी मनुष्य आणि पक्ष्यांचा मृत्यू टाळण्यासाठी मकर संक्रांती सणाच्या आधी पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजा किंवा चायनीज मांजा यांच्या वापरावर, विक्रीवर आणि साठवणुकीवर बंदी घातली आहे. जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे म्हटले होते. त्यानंतरही मुंबईत चायनीज मांजाने बळी घेतले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.