देवेन भारती यांना दिलासा, राज्य सरकारने चौकशी अहवाल फेटाळला

164

तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असणारा कुख्यात गुंड विजय पालांडे यांच्या आरोपावरून चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्या विरोधातील चौकशीचा अहवाल राज्य सरकारने फेटाळून लावला आहे. देवेन भारती यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप पालांडे याने केला होता. सरकारने आरोप फेटाळून लावल्यामुळे देवेन भारती यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

( हेही वाचा : Hindusthan post Impact : ‘महानंद’मधील दूध टंचाईची सरकारकडून दखल )

भारती १९९४ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्त आहेत. त्यांनी यापूर्वी गुन्हे शाखेत काम केले असून ते मुंबईत सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते आणि एटीएस प्रमुखही होते. कुख्यात गुंड विजय पालांडे हा हत्येसह अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरल्यानंतर नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या पालांडे याने देवेन भारती यांच्यावर आरोप केले होते, की भारती यांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहे.

पालांडे यांने केलेल्या आरोपावरून तत्कालीन गृहमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. २०२० मध्ये तत्कालीन पोलिस महासंचालक आणि तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना चौकशीचा अहवाल पाठवण्यात आला होता, चौकशीत देवेने भारती यांचे अंडरवर्ल्डशी कुठलेही संबंध आढळले नाहीत.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहरक्षक दलाचे तत्कालीन डीजी संजय पांडे यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत आदेश दिल्यानंतर पुन्हा नव्याने चौकशी सुरू करण्यात आली होती. संजय पांडे यांनी देशमुख यांना सादर केलेल्या अहवालात देवेन भारती यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता, त्यानंतर हा अहवाल पुढील प्रक्रियेसाठी राज्याच्या गृहविभागाकडे सोपविण्यात आला होता. या अहवालाला देवेन भारती यांनी आव्हान देत त्यांच्या विरुद्ध लावण्यात आलेल्या चौकशीचा इन्कार केला, आणि त्यांनी असा दावा केला की भारतीय नागरी सेवा नियमांनुसार चौकशीचे आदेश दिले गेलेले नाहीत. भारती यांचे म्हणणे सरकारने मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

पालांडे यांनी देवेन भारती यांच्यावर केलेले आरोप योग्य नाही, तसेच या चौकशीत कायद्याचे पालन करण्यात आले नसल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे पांडे यांचे दिलेला चौकशीचा अहवाल राज्य सरकारकडून फेटाळण्यात आले आहे, यामुळे भारती यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.