Salman Khan : सलमानच्या घरासमोर गोळीबाराचा कट महिन्याभरापूर्वी शिजलेला; ४ ते ५ वेळा केलेली रेकी

250

सलमान खान (Salman Khan) निवासस्थाना बाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने रायगड जिल्ह्यातील पेण येथून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांपैकी एकाने हल्लेखोरांना जुन्यातील मोटारसायकल विकली होती तर दुसऱ्याने त्यांची पनवेल येथे दोन्ही हल्लेखोरांची राहण्याची व्यवस्था केली होती. तिसरी व्यक्ती ही घर मिळवून देण्यासाठी एजंट आहे, अशी माहिती समोर येत आहे. सलमान खानच्या ‘गॅलक्सी अपार्टमेंट’ या निवासस्थानावर करण्यात आलेल्या गोळीबाराची योजना एक महिन्यापूर्वी आखण्यात आली होती, अशीही माहिती समोर येत आहे.

हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईने घेतली

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) वांद्रे येथील ‘गॅलक्सी अपार्टमेंट’ या निवासस्थानावर रविवारी, पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळीबार करून पोबारा केला आहे. या हल्ल्यामागे पंजाबचा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या हल्ल्याची जबाबदारी देखील लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली असून त्याने फेसबुकवर एक पोस्ट लिहून व्हायरल केली आहे. गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या पथकाने फेसबुकवर पोस्ट पाठवणाऱ्याचा आयपी अड्रेस शोधला असता कॅनडा येथून ही फेसबुक पोस्ट करण्यात आली होती.

(हेही वाचा PM Narendra Modi यांनी सांगितले २० वर्षांचे व्हिजन; म्हणाले…)

पोलिसांची कारवाई 

या गोळीबाराचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला असून हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल वांद्र्यातील माउंटमेरी येथे मिळून आल्यानंतर या मोटरसायकलच्या मालकाचा शोध घेण्यात आला असता ही मोटरसायकल रायगड जिल्ह्यातील पेण येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने हल्लेखोरांना विकली होती, अशी माहिती समोर आली. गुन्हे शाखेने पेण येथून मोटरसायकल मालक आणि हल्लेखोरांना राहण्यासाठी पनवेलमध्ये घर भाड्याने देणाऱ्या घरमालकाला आणि घर मिळवून देण्यास मदत करणाऱ्या एजंट असे तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सलमान खानच्या (Salman Khan) निवासस्थानावर गोळीबाराचा कट हा एक महिन्यापूर्वी शिजला होता, यासाठी राज्याच्या बाहेरचे दोन हल्लेखोरांची नेमणूक करण्यात आली होती. हे हल्लेखोर पनवेल येथे महिन्याभरापासून भाड्याने खोली घेवून राहत होते, त्यांनी हल्ल्यासाठी जुन्यातील मोटारसायकल खरेदी केली होती. या मोटरसायकलवरून त्यांनी महिन्याभरात चार ते पाच वेळा सलमानच्या (Salman Khan) निवासस्थानाची रेकी केली होती अशी माहिती समोर येत आहे, त्यात धक्कादायक बाब म्हणजे ईद च्या दिवशी हे हल्लेखोर सलमानच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या चाहत्याच्या गर्दीत देखील सामील झाले होते अशी माहिती समोर आहे. हल्लेखोरांचा अटकेसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या चार विविध पथके तयार करण्यात आलेली असून ही पथके विविध राज्यात रवाना झाली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.