“पत्नी मला रोज जेवणात बंगाली बाबाची जडिबुटी देत होती, या जडीबुटीमुळे माझ्या संपूर्ण शरीरात इन्फेक्शन झाले, आणि मी सतत आजारी पडत आहे, माझी पत्नी मला वेडं करून ठार मारण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार मुंबईतील एका सोने व्यापाऱ्याने केली. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.
सोमेन वैद्यनाथ राय असे पत्नीच्या कृत्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या सोने व्यापाऱ्याचे नाव आहे. सोमेन राय हे पत्नीच्या भीतीने सध्या दादर मधील हिंदू कॉलनी येथे भाड्याने एकटेच राहत आहेत. सोमेन यांचा काळबादेवी येथे सोन्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे.
सोमेन हे पत्नी प्रकृती राय आणि तीन मुलांसह शिवडीतील कात्रक रोड येथील भव्य हाईट्स या इमारतीत राहण्यास होते.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : महाराष्ट्रात मोदी पॅटर्न; ‘मन की बात’च्या धर्तीवर ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रम)
मागील १५ वर्षांपासून सोमेन आणि प्रकृती या दाम्पत्यात वाद सुरू आहे. २०१८ मध्ये पत्नी हिची भावजयी हिने सोमेन याला फोन करून सांगितले की, “तुझी पत्नी आणि तिची आई , बहीण आणि भाऊ पश्चिम बंगाल मधील औरंगाबाद येथुन एका बंगाली बाबा कडून जडिबुटी घेऊन तुझ्या जेवणात जडीबुटी टाकून तुला वेडं करून ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र माझा यावर विश्वास बसत नसल्यामुळे तीने मला पत्नीची आई आणि एक त्रयस्थ व्यक्तीमध्ये झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग पाठवले. हे रेकॉर्डिंग एकूण मला धक्काच बसला असे सोमेन राय याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पुढे सोमेन यांनी तक्रारीत म्हटले आहे की, याबाबत मी पत्नीला जाब विचारला असता तीने मला जीवे मारण्याची धमकी दिली, या घटनेनंतर मी वेगळे जेवण बनवून खाऊ लागलो. पत्नीने त्यानंतरही माझा मानसिक छळ सुरु केला.पत्नीच्या छळाला कंटाळून अखेर वेगळे राहण्याचा निश्चय करून दादर येथील हिंदू कॉलनीत घर भाड्याने घेऊन एकटे राहू लागलो. वारंवार आजारी पडत असल्यामुळे सोमेन यांनी उपचार सुरू केले असता संपूर्ण शरीरात इन्फेक्शन पसरल्यामुळे आजारी पडत असल्याचे निदान डॉक्टरांनी केले असल्याचे देखील सोमेन यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सोमेन आणि पत्नी या दोघांचे मिळून बँकेत असलेल्या जॉईंट खात्याच्या बँक लॉकर मधून सोमेनच्या पश्चात पत्नी प्रकृती हिने अडीज किलो सोनं आणि १५ लाख रुपयांची रोकड काढल्याचा आरोपी सोमेन याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सोमेन याने दिलेल्या तक्रारीवरून रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी प्रकृती राय, सुभरा राय आणि पपिया बरमन यांच्या विरुद्ध हत्येचा प्रयत्न, गुंगीचे औषध देणे, चोरी, धमकी देणे आणि महाराष्ट्र नरबळी अमानुष, जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community