युनानी आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करीत असल्याची बतावणी करून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका युनानी डॉक्टरसह चार जणांना मुंबई गुन्हे शाखेने (Crime) अटक केली आहे. मोहम्मद शेरु शेख मकसुद खॉ उर्फ डॉ. आर. पटेल (४९), मोहम्मद नफीस मो. शरीफ (३९ ), मोहम्मद आसिफ मो. निसार (२७) आणि मोहम्मद अशिफ मो. शरीफ (४४) असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. हे चौघेही राजस्थान राज्यात राहणारे आहेत.
ही टोळी इतर साथीदारांसह दोन ते तीन महिन्यांसाठी महाराष्ट्रात येतात व मनोर पालघर, भिवंडी-ठाणे, मालेगांव, नाशिक या ठिकाणी मोकळया मैदानात तंबू बांधून कबिल्यात वास्तव्य करतात. सावज हेरण्यासाठी ही टोळी मुख्य शहरातील रुग्णालयाच्या बाहेर उभी राहून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेर गाठतात, त्यानंतर ही टोळी स्वतःला युनानी आयुर्वेदिक वैदयकिय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर असल्याचे भासवून त्यांचे अहमदाबाद, गुजरात येथे युनानी आयुर्वेदिक उपचाराकरीता रुग्णालय असल्याचे सांगतात.
त्यानंतर त्या रुग्णाला युनानी आयुर्वेदीक उपचार पध्दतीने घरी येऊन उपचार करू असे सांगून रुग्णाकडून उपचाराच्या नावाखाली लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक करीत होते. या टोळीने असाच प्रकारची फसवणूक मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे एका ६१ वर्षीय व्यवसायिकांची केली होती. ‘ट्रेमर’ या आजाराने त्रस्त असलेल्या या व्यवसायिकाला या चौघांनी नरिमन पॉईंट येथे गाठून त्यांच्यावर युनानी पद्धतीने खात्रीशीर उपचार करुन त्यांना तात्काळ बरे करण्याबाबत त्यांचा विश्वास संपादित केला.
त्यानंतर व्यवसायिक यांच्या वडाळा येथील घरी येवून, त्यांची तपासणी करुन पित्तामुळे त्यांच्या शरीरातील नसा दबल्याचे सांगितले, त्यामुळेच यांचे दोन्ही हात थरथरत असल्याचे सांगून दोन्ही बाजूस छिद्र असलेली मेटल क्युब (तुंबडी) व्यवसायिक यांच्या दोन्ही हातास व पाठीला लावून, त्याद्वारे रक्त साठून झालेल्या व्रणावर ब्लेडने त्यांच्या शरीरातील सर्व पित्त शरीराबाहेर काढल्याचे सांगून तुम्ही आता पूर्ण बरे झाले आहे असे सांगितले व त्यांच्याकडून १४ लाख ५० हजार रुपये उकळले. आपली फसवणूक करण्यात आल्याचे त्यांच्या उशिरा लक्षात आले व त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात २८ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३ चे पथकाला या युनानी डॉक्टरांची माहिती मिळाल्यानंतर कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक समीर मुजावर, पो.ह. कृतिबास राऊळ, अरूण घाटकर, वैभव गिरकर, सचिन सरवदे, पो.शि. विकास चव्हाण, राहुल पाटील, गोविंद पानखडे, व पो.ह. चालक अनिकेत मोरे या पथकाने या टोळीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली.या टोळीजवळून पोलिसांनी वैदयकिय उपचाराचे सर्व साहित्य, ०९ मोबाईल फोन, सिमकार्डस्, वॅगनार मो/कार व गुन्हयातील फसवणुक झालेली १४ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.