८०च्या दशकात सोन्याच्या तस्करीत ‘हाजी मस्तान, करीम लाला, दाऊद इब्राहिम ही नावे प्रामुख्याने घेतली जात होती. ८०चा काळ लोटला, तस तसे या टोळ्यांच्या तस्करीतील वर्चस्व संपले आणि या टोळ्या अमली पदार्थाच्या तस्करीत पुढे आले. समुद्र मार्गे होणारी सोन्याची तस्करी आता हवाई मार्गाने होऊ लागली आणि सोन्याच्या तस्करीत सोन्याच्या व्यापाऱ्याचा शिरकाव झाला. आंतरराष्ट्रीय सोनं तस्करी रॅकेटमध्ये केरळ राज्यातील मोहम्मद अली आणि पुत्र शबीब अली ही नावे सध्या सर्वात आघाडीवर आहे.
महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) एप्रिल महिन्यात मोहम्मद अली आणि शबीब अली या पितापुत्राला अटक करून सोन्याच्या तस्करीतील एक टोळी संपुष्टात आणली. केरळस्थित मोहम्मद अली आणि शबीब अली यांचे दुबईत दागिन्यांचे मोठे शोरूम आहे. या दुकानाच्या आडून हे पितापुत्र मुंबईसह देशातील इतर राज्यामध्ये सोन्याच्या तस्करीचे रॅकेट चालवत होते. प्रामुख्याने या टोळीत तस्करीसाठी परदेशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याचे समोर आले. अली पितापुत्राच्या रॅकेटमधील १८ सुदानी नागरिकांना डीआरआयने मुंबई विमानतळावरून अटक केली होती, त्यांच्या जवळून १० कोटी रुपयांचे १६ किलो सोने जप्त करण्यात आले होते. अली पितापुत्र हे मागील अनेक वर्षांपासून भारतात सोनं तस्करीचा व्यवसाय करत आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सुहेल पूनावाला हा या टोळीतील भारतातील प्रमुख समन्वयक आहे. परदेशी प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे, विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचारी यांना हाताशी धरून सोनं विमानतळाच्या बाहेर काढणे ही कामे सुहेल हा करीत होता.
(हेही वाचा Kirit Somaiya : मुंबई महापालिका भूसंपादन घोटाळ्याविरोधात किरीट सोमय्यांनी केली तक्रार दाखल)
सुहेलच्या अटकेनंतर तपास यंत्रणेला गोविंद राजपूत हे नाव तपासात पुढे आले. गोविंद राजपूतचे झवेरी बाजार येथे दागिन्यांचे दुकान आहे, पूनावाला विदेशी नागरिकांकडून तस्करीचे सोनं गोळा करून ज्वेलरी युनिटमध्ये काम करणार्या अन्य आरोपी युनूस शेखला देत असे. युनूस सोने वितळवून बाजारात विकणाऱ्या राजपूतांना देत होता. डीआरआयने झवेरी बाजार येथील राजपूत यांच्या दागिन्यांच्या दुकानावर छापा टाकला आणि ८८ लाख रुपयांचे सोनं जप्त केले होते, या प्रकरणात आतापर्यंत पंचवीस जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली.
डीआरआयच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार मुंबई हे तस्करांसाठी एक प्रमुख केंद्र आहे,मुंबईत देशभरातील इतर शहरांच्या तुलनेत जास्त सोन्याचा वापर होतो, तसेच मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे मोठ्या प्रमाणात येतात, दर्जेदार डिझाईन्सचे सोन्याचे दागिने खरेदीसाठी विविध राज्यांतील खरेदीदार झवेरी बाजारमध्ये येत असतात असे ही अधिकारी यांनी म्हटले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाने गेल्या तीन वर्षांत ५११ कोटी किमतीचे सुमारे १०२९ किलो सोने जप्त केले आहे.
Join Our WhatsApp Community