मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त हे पद महत्वाचे मानले जाते,परंतु मागील काही वर्षांपासून या पदावर पूर्णवेळ उपायुक्त मिळेनासे झाले आहे. या पदावर येणारे अधिकारी यांची कुठल्या न कुठल्या कारणावरून बदली करण्यात येत असल्यामुळे गुन्हे शाखेच्या या महत्वाच्या पदावर पूर्णवेळ उपायुक्त कधी मिळतील असा सवाल गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.
मुंबईच्या गुन्हे शाखेला इतिहास आहे, मुंबई गुन्हे शाखेने मुंबईतील गँगवार आणि गुन्हेगारी मोडीत काढत मुंबई पोलिसांचे नाव जगाच्या पाठीवर कोरले आहे. आजही मोठमोठे गुंड, गुन्हेगार मुंबई गुन्हे शाखेच्या नावाने थरथर कापतात. मात्र गुन्हे शाखेची गुन्हेगारावरील पकड कमी होत चालली आहे, यामागे कारण म्हणजे मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिका ऱ्याचा अंतर्गत वाद आहे.
सचिन वाजे या बडतर्फ पोलीस अधिकाऱ्या च्या कृत्यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची बदनामी, त्यात गुन्हे शाखेतील अनेक मातब्बर पोलीस अधिकाऱ्याच्या झालेल्या बदल्यामुळे गुन्हे शाखा खूप मागे पडत गेली. वाजे प्रकरणानंतर गुन्हे शाखेला उभारी देण्यासाठी वरिष्ठ दर्जाच्या अधिकारी यांना गुन्हे शाखेत आणण्याच्या प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांना पूर्णवेळ काम करण्यास मिळाले नाही. कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्याच्या इतरत्र बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
अडीज वर्षात पाच पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेला मिळाले……
मुंबई पोलीस दलात गुन्हे शाखेचा भार सांभाळण्यासाठी १ सहपोलीस आयुक्त दोन उपायुक्त आणि ६ सहाय्यक आयुक्त ही पदे आहेत. मुंबईत गुन्हे शाखेचे एकूण १२ युनिट आणि ३ विशेष युनिट आहेत. एक ते सहा युनिट आणि विशेष युनिटला एक पोलीस उपायुक्त असून उपनगरातील ७ ते १२ हे युनिट प्रकटीकरण १ ला दुसरे पोलीस उपायुक्त अँटिलिया स्फोटक प्रकरणाला जवळजवळ अडीज वर्षे होता आहे. या अडीज वर्षात मुंबई गुन्हे शाखेला पाच पोलीस उपायुक्त लाभले.
अँटिलिया प्रकरण झाले त्यावेळी नंदकुमार ठाकूर हे पोलीस उपायुक्त होते,वाजे प्रकरण झाल्यानंतर कालावधीपूर्वी त्यांची बदली करण्यात आली, आणि प्रकाश जाधव यांची गुन्हे शाखेत पोलीस उपायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. जाधव यांची कालावधीपूर्वीच बदली झाली आणि अतिरिक्त भार म्हणून बालसिंग राजपूत यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यानंतर पोलीस उपायुक्त नीलोत्पल याची गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त पदी नेमणूक झाली. त्यांची कालावधी अल्पवधीची ठरली. दरम्यान परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांना गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त नेमण्यात आले. कदम यांची काही महिन्यात बदली करून त्यांची परिमंडळ ४ मध्ये बदली करण्यात आली.
प्रशांत कदम यांच्या बदली नंतर रिकाम्या झालेल्या या पदावर अखेर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांची नेमणूक करण्यात आली. दोन महिन्याच्या आतच बालसिंग राजपूत यांना प्रतीनियुक्तीवर मुख्यमंत्री यांचे ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सध्या गुन्हे शाखेचे हे पद रिकामे असून बालसिंग राजपूत यांच्या बदलीनंतर डिटेक्शन १ चे पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्याकडे तात्पुरता कार्यभार देण्यात आला होता परंतु ते देखील एक महिन्याच्या प्रशिक्षणाला गेल्यामुळे गुन्हे शाखेचा प्रभारी उपायुक्त म्हणून अमोघ गांवकर यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आलेला आहे. मुंबई गुन्हे शाखेला पूर्णवेळ पोलीस उपायुक्त कधी मिळणार असा सवाल गुन्हे शाखेचे अधिकारी यांना पडला आहे.