दिवाळी सणाला घरी पैसे पाठविण्यासाठी त्याने चक्क बँकेच्या एटीएम मशीन फोडून त्या जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील एका तरुणाला बोरिवली पोलिसांनी अटक (Crime) केली आहे.
ओंकार शिलावंत (२२) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार हा मूळचा सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुंबईत नोकरीच्या शोधात आला होता. ओंकारच्या घरची परिस्थिती तशी हलाखीचीच आहे, त्यात दिवाळी सण जवळ आल्यामुळे घरी दिवाळी सणाला पैसे पाठवायचे म्हणून त्याने पैसे मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे अखेर त्याने बँकांचे एटीएम मशीन मधून पैसे चोरण्याची योजना आखली.
ओंकार याने रविवारी रात्रीच्या वेळी बोरिवलीतील चार वेगवेगळ्या बँकांच्या एटीएम मशीन मधून पैसे चोरण्यासाठी त्याने बँकेच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला अपयश आल्यामुळे रागाच्या भरात ओंकारने एका एटीएम मशीन मध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाजता त्यांना दिल्लीतील स्मॉल फायनान्स बँकेच्या सुरक्षा कंपनीकडून पोलिसांना फोन आला, त्यांना माहिती देण्यात आली की त्यांचे एटीएम मशीन लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे (Crime) आणि त्यांच्याकडे या घटनेचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आहेत.
पोलिसांनी एक गस्त पथक घटनास्थळी पाठवले मात्र त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. सीसीटीव्ही रेकॉर्डिंग स्कॅन केल्यावर अधिकाऱ्यांनी पाहिले की निळ्या रंगाचा चेक शर्ट घातलेल्या चोराने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. चोराचा शोध घेण्यासाठी पोलिस त्याच्या मागावर गेले, एक किलोमीटर अंतरावर पोलिसानी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या चोराला त्याच्या शर्टवरून ओळखले. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी चोराला अडवून ताब्यात घेतले.
दरम्यान बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापक दीपक शहा यांनी पोलिसांना फोन करून त्यांच्या बोरिवली पश्चिम येथील शिंपोली येथील एटीएम मशीनला एका व्यक्तीने आग लावल्याची माहिती दिली. बँकेने पाठवलेले सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पाहिल्यावर त्यांना ओंकार हा एटीएम मध्ये माचिस घेऊन जात होता आणि डस्टबिनमधून छापील पावत्या गोळा करून त्या मशीनच्या पडद्याजवळ ठेवून त्याला आग लावली. एटीएममधून पैसे चोरण्याचा आणि एक एटीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी ओंकार शिलावंत याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर ओंकारने पोलिसांना सांगितले की, दिवाळीसाठी सातारा येथील घरी पैसे पाठवायचे होते, त्यामुळे एका रात्रीत चार एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, पैसे काढता आले नाही म्हणून रागाच्या भरात त्याने एटीएम मध्ये आग लावली.