- प्रतिनिधी
पत्नीच्या हत्येनंतर लपून बसण्यासाठी चार राज्ये फिरणाऱ्या पतीला अखेर मुंबईच्या ट्रॉम्बे पोलिसांनी दक्षिण भारतातील चेन्नई रेल्वे स्थानकातून ताब्यात घेऊन मुंबईत आणून अटक केली आहे. आरोपी एक आठवडा पोलिसांना गुंगारा देत दिल्ली, राजस्थान, गुजरात त्यानंतर चेन्नई येथे पोहचला होता, त्याच्या मागावर असणाऱ्या आमच्या पोलीस पथकाने त्याला चेन्नई स्थानकावर ताब्यात घेतले अशी माहिती परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली. (Crime)
अमोल पवार (३५) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. अमोल पवार हा मूळचा सातारा जिल्ह्यातील एका गावात राहणारा आहे. त्याचा विवाह सातारा जिल्ह्यातीलच राजेश्री (३०) सोबत झाला होता. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. अमोल पवार काही वर्षांपूर्वी मुंबईत आला होता. मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथे भाडेतत्वावर राहत होता. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हमालीचे काम करणाऱ्या अमोल याने गावी नातेवाईक, मित्र मंडळी तसेच गावातील इतरांकडून मुंबईत नोकरी लावतो म्हणून छोट्या मोठ्या रकमा घेतल्या होत्या. जवळपास त्याने ४० ते ४५ जणांकडून याप्रकारे पैसे घेतले होते, त्यापैकी त्याने कोणालाही नोकरी लावली नव्हती. (Crime)
(हेही वाचा – प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा; Hindu Janjagruti Samiti ची मागणी)
सर्वांनी त्याच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता. त्याने सर्व पैसे डान्सबारमध्ये उडवल्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. नातेवाईक मित्र-मंडळींनी त्याच्याकडे पैशाचा तगादा लावल्यामुळे त्याने पत्नीकडे तिचे सोन्याचे दागिने मोडण्यासाठी मागितले होते. परंतु पत्नीने पैसे दागिने देण्यास नकार दिला होता, आणि सर्व दागिने आणि दोन्ही मुलींना माहेरी ठेवले होते. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी दागिन्यांवरून पती पत्नीत भांडण झाले आणि या भांडणात अमोल याने पत्नीचा गळा आवळून हत्या केली, त्यानंतर त्याने घराला बाहेरून कडी लावून पळ काढला. (Crime)
ट्रॉम्बे पोलिसांनी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर मधील एका खोलीत महिलेचा मृतदेह मिळाला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली होती, व तिच्या नातेवाईकांचा शोध घेणे सुरू असताना मृत राजेश्री पवार हिची नणंद हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार राजेश्रीचा पती अमोल याने राजेश्रीची हत्या केल्याचे फोन करून कळवले. राजेश्रीची हत्या पतीने केल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाराम वळवी, सपोनि. सुशील लोंढे, पोलीस उपनिरीक्षक शरद नानेकर, काकड, माळवेकर या पथकाने पती अमोलचा शोध सुरू केला असता त्याचे हत्येच्या दिवशी पहिले लोकेशन नवी मुंबई दाखवले. त्यानंतर त्याचा मोबाईल फोन बंद असल्यामुळे पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. (Crime)
(हेही वाचा – Assembly Session : अजित पवारांचे लक्ष जयंत पाटलांवर!)
पोलीस पथकाने नवी मुंबईतील सर्व ठिकाणे, बार, डान्स बारमध्ये त्याचा शोध घेतला. त्यानंतर त्याच्या गावी देखील पोलीस पथक जाऊन आले. परंतु त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. दोन दिवसांनी अमोल याने एका नातेवाईकाला फोन करून पैशांची मागणी केली. ही बाब पोलीस पथकाला कळताच पोलिसांनी आलेल्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला असता, तो मोबाईल क्रमांक दिल्लीतील ओला चालकाचा निघाला. (Crime)
पोलीस पथक दिल्लीला दाखल झाले व ओला चालकाचा शोधून त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपी अमोलच्या बोलण्यात सतत चेन्नई आणि गुजरात उल्लेख येत असल्याचे ओला चालकाने सांगितले. पोलीस पथक गुजरात, राजस्थान पालथे घातले, परंतु आरोपी तेथेही मिळून आला नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त ढवळे यांनी दिली. दरम्यान एक पथक चेन्नईला पाठविण्यात आले तर दुसरे पथक आरोपीचा शोध घेत सातारा येथे त्याच्या गावी दाखल झाले. त्यादरम्यान गावी एका नातेवाईकाला एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. पोलिसांनी हा कॉल कुठून आला याची माहिती काढली असता सदर कॉल हा चेन्नई रेल्वे स्थानकातून आला असून आरोपी अमोल याने नातेवाईकांना फोन करून खर्चासाठी पैसे मागितले. पोलिसांनी नातेवाईकांना अमोलला बोलण्यात गुंतविण्यास सांगून साताऱ्यातील पोलीस पथकाने चेन्नईत असलेल्या पोलीस पथकाला माहिती दिली. चेन्नईला गेलेल्या पोलीस पथकाने अमोल याचा चेन्नई रेल्वे स्थानकात शोध घेऊन त्याला एका व्यक्तीच्या फोनवरून बोलताना ताब्यात घेतले अशी माहिती पोलीस उपायुक्त ढवळे यांनी दिली. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community