- प्रतिनिधी
पतीला तुरुंगातून सोडविण्यासाठी पोटच्या सव्वा महिन्याच्या मुलीची विक्री करणाऱ्या मातेसह मुले विक्री रॅकेट चालविणाऱ्या ९ जणांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. मुले विक्री रॅकेटचे तीन राज्यांमध्ये जाळे पसरले आहे. विक्री करण्यात आलेल्या सव्वा महिन्याच्या मुलीची सुटका कर्नाटक राज्यातील कारवार येथून करण्यात आली आहे. चोरीच्या गुन्ह्यात दादर रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या पतीने तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी पत्नीकडे तगादा लावला होता. परंतु जामिनासाठी पैसे नसल्यामुळे पत्नी काहीही करू शकत नव्हती. त्यावेळी पतीने मुलीची विक्री करून मला बाहेर काढ असा सल्ला पत्नीला दिला होता. त्यानंतर तिने गुजरातच्या वडोदरा येथे राहणाऱ्या दोन महिलांच्या मदतीने तिच्या सव्वा महिन्याच्या मुलीची विक्री केली. मोबदल्यात तिला दीड लाख रुपये मिळाले. हा सर्व प्रकार विक्री करण्यात आलेल्या सव्वा महिन्याच्या मुलीच्या आजीला कळाला असता तिने ११ डिसेंबर रोजी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Crime)
(हेही वाचा – World’s Richest 2024 : जगातील १०० अब्ज क्लबमधून यंदा अदानी, अंबानी बाहेर)
पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करून तक्रारदार महिलेच्या सुनेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिने पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. पतीला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी मुलीची विक्री केल्याची कबुली दिली. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून गुजरात, कर्नाटक आणि मुंबई ठाण्यामध्ये त्याचे जाळे पसरले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. परिमंडळ ४ च्या पोलीस उपायुक्त रागासुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ४ मधील माटुंगा आणि इतर पोलीस ठाण्याचे एक पथक या गुन्ह्याच्या तपासकामी तयार करण्यात आले. या पथकाने मुंबईतील दादर, शिवडी, दिवा, उल्हासनगर, कल्याण, बडोदरा, आणि कर्नाटकातील कारावार येथून सुलोचना सुरेश कांबळे (४५), मिरा राजाराम यादव (४०), योगेश भोईर (३७), रोशनी घोष (३४), संध्या राजपूत (४८), मदिना उर्फ मुन्नी इमाम चव्हाण (४४), तैनाज शाहिन चौहान (१९), बेबी मोईनुद्दीन तांबोळी (५०) यांच्यासह तक्रारदार महिलेच्या सुनेला अटक करण्यात आली. दरम्यान विक्री करण्यात आलेल्या मुलीची कारवार येथून एका दाम्पत्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. (Crime)
(हेही वाचा – Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १४०० कोटींची तरतूद)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुले विक्री रॅकेटमध्ये कारवार येथील एकास्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचा आणि नर्सचा सहभाग असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. तसेच या रॅकेट मधील काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून या रॅकेटने मागील काही महिन्यात ५ ते ६ मुलांची विक्री केली असून हे रॅकेट एक मुल ५ ते ६ लाखात विकत होते. व मुलांना जन्म देणाऱ्या ‘सरोगेट मदर’ तसेच फुटपाथवर राहणाऱ्या मातांना एक ते दीड लाख रुपये देत होते. अटक करण्यात आलेल्या महिलांना प्रत्येक मुलांमागे १५ ते २० हजार मिळत होते अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला या लग्न जुळविणे, लग्नात मंडप सजवणे हे काम करतात, तसेच गरीब महिलांना पैशांचे अमिष दाखवून त्यांची मुले विकण्यास प्रवृत्त करतात अशी माहिती समोर आली आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community