काळबादेवी येथील एका सोन्याच्या कारखान्यात दोन व्यक्तींनी बंदुकीच्या धाकाने लूटमार केली. (Crime) गुरुवारी रात्री ही घटना घडली असून हे दोघेही १३० ग्रॅम सोने घेऊन फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी दक्षिण मुंबईतील स्वदेशी मार्केट, काळबादेवी येथील दुकानात दागिने बनवणाऱ्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या ओळखीच्या व्यक्तींची नावे घेऊन प्रवेश केला आणि बंदुकीच्या धाकाने लुटले.
(हेही वाचा –NMMT: ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास, दिवाळीनिमित्त एनएमएमटीची भेट )
खंडेलवाल सदन, स्वदेशी मार्केट येथील युनिटमध्ये राहणाऱ्या युनिटमधील कामगार प्रशांत साहू (३९) याने शुक्रवारी पोलिसात दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. साहू यांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सायंकाळी ते सोन्याच्या कारखान्यात बसले होते. तेव्हा २ व्यक्ती त्यांच्याकडे आल्या. त्यावेळी ही घटना घडली. त्यांच्यापैकी एका व्यक्तिने राजेश रॉय अशी स्वत:ची ओळख करून दिली. त्यानंतर त्या दोघांनीही कारखान्यात प्रवेश केला. आत प्रवेश केल्यानंतर लगेचच एकाने पिस्तूल आणि दुसऱ्याने चाकू काढला. कामगारांकडे पिस्तूल दाखवत त्यांनी कामगारांना धमकावले आणि युनिटमध्ये ठेवलेले सर्व सोने आणण्यास सांगितले , अशी माहिती एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेली पुढिल माहिती अशी की, “त्यांनी युनिटमधून सुमारे १३० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तारा आणि पेंडंट घेतले आणि पळून गेले”.
सोन्याची लूटमार करणाऱ्या आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३९४ (लुटमारी करताना स्वेच्छेने दुखापत करणे) आणि ३४ (समान हेतू) आणि भारतीय शस्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यामध्ये दोन्ही आरोपी कैद झाले असून आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.