-
प्रतिनिधी
सासूने आपला संसार उध्वस्त केला या संशयाने पेटून उठलेल्या जावयाने सासूला टेम्पोत कोंबून जिवंत जाळून ठार केल्याची घटना मुलुंड पूर्व येथे घडली. या जाळपोळीत जावई देखील गंभीररित्या भाजल्याने त्याचा देखील मृत्यू झाला असून नवघर पोलिसांनी जावयाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा आष्टणकर (५६) असे मृत जावयाचे तर बाबी उसरे (७२) सासूचे नाव आहे. कृष्णा याची सासू मुलुंड पूर्व नाणेपाडा येथे राहण्यास होती. कृष्णा याची पत्नी ७ ते ८ वर्षांपूर्वी त्याला सोडून मुलासह माहेरी नाणेपाडा येथे रहाण्यास आहे. मुलीचे लग्न झाले असून मुलगा हा अंधेरी येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. (Crime)
मुलुंड पूर्व नाणेपाडा येथे सोमवारी सकाळी एका टेम्पोला आतून आग लागली असून त्यात दोन व्यक्ती असल्याची माहिती नवघर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलासह नाणेपाडा येथे धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने टेम्पोचे शटर तोडून आग विझविण्यात आली. दरम्यान टेम्पोतून दोन जणांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून त्याला नजीकच्या रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता सदरचा टेम्पो हा कृष्णा आष्टणकर याचा असून आणि या टेम्पोत भाजलेली महिला कृष्णा याची ७२ वर्षाची सासू बाबी उसरे आणि भाजलेला पुरुष हा कृष्णा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. (Crime)
(हेही वाचा – Iran च्या तेल उद्योगाशी संबंध असल्याबद्दल ४ भारतीय कंपन्यांवर ट्रम्प प्रशासनाकडून निर्बंध)
पोलिसांच्या अधिक चौकशीत कृष्णा याची पत्नी मागील अनेक वर्षांपासून माहेरी आईकडे राहण्यास असून सध्या त्या बोरिवली येथे पेशंट सांभाळण्याच्या कामासाठी आहे. पोलिसांनी कृष्णा यांची पत्नी आणि मुलाला संपर्क साधून त्याचा जबाब नोंदवला असता कृष्णा हा दारूच्या नशेत पत्नी आणि मुलांना मारहाण करीत असल्यामुळे पत्नी ७ ते ८ वर्षांपूर्वी माहेरी आईकडे राहण्यास आली होती. कृष्णा हा अधूनमधून पत्नी आणि मुलांना भेटायला सासरी जात असे आणि सासूने पत्नीचे कान भरल्यामुळे ती नांदायला येत नाही, असा संशय कृष्णाला होता. त्यातून तो सतत सासू बाबी यांच्याशी भांडायचा. (Crime)
सोमवारी सकाळी ८ वाजता कृष्णा हा सासूकडे गेला होता, तिला रुग्णालयात घेऊन जातो असे सांगून त्याने सासू बाबीला टेम्पोत मागे बसवले, आणि तो देखील टेम्पोत मागे गेला आणि त्याने टेम्पोचे शटर बंद करून सासूच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. त्यानंतर सासूला टेम्पोतच पेट्रोल ओतून पेटवून दिले, या जाळपोळीत कृष्णा हा देखील गंभीर जखमी होऊन त्याचा देखील मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने टेम्पोचे शटर उघडून दोघांना बाहेर काढले आणि वीर सावरकर रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत्यू घोषित केले. या प्रकरणी नवघर पोलिसांनी मृत जावयाविरुद्ध हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community