सोशल मीडियावर येणाऱ्या जाहिरातीला लष्करातील एक जवान बळी पडला आहे, फेसबुकवर असलेल्या एका जाहिरातीमुळे या लष्कराची ४५ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. कर्ज देण्याच्या नावाखाली ६ जणांनी लष्करातील या जवानांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष पवार (४५) असे भारतीय लष्करातील जवानाचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुका खालुम्बरे गावात राहणारे जवान सुभाष पवार हे तळेगाव -दाभाडे या ठिकाणी कार्यरत आहेत. पवार यांचा राहत्या गावी शेती व हॉटेल व्यवसाय आहे. पवार यांना हॉटेल व्यवसाय वाढवण्यासाठी कर्जाची गरज होती, त्यासाठी सुभाष पवार हे प्रयत्नात होते. दरम्यान त्यांना फेसबुकवर बँकेकडून कर्ज मिळवून देण्याबाबत एक जाहिरात दिसली. सोबत एक लिंक आणि मोबाईल क्रमांक देण्यात आला होता.
पवार यांनी त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता कर्जासंदर्भात बोलणी करण्यासाठी पवार यांना नवी मुंबईतील रमाडा हॉटेल येथे राहुल प्रजापती यांना भेटण्यासाठी बोलवण्यात आले. सुभाष पवार हे मित्रांसोबत राहुल प्रजापती सह दोघांना भेटले व त्यांनी कर्ज मिळवून देण्याचे सांगत जमिनीची कागदपत्रे ताब्यात घेऊन ४० कोटींच्या कर्जासाठी ६० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल असे सांगून या दोघांनी राजेश मामुनकर आणि रोहित जाधव यांची भेट घालून दिली.
दरम्यान सांताक्रूझ येथे एका हॉटेलमध्ये त्यांना स्टॅम्प ड्युटीचे पैसे घेऊन बोलावण्यात आले. सुभाष पवार हे सांताक्रूझ येथे भेटण्यासाठी आले व त्यांनी ३३ लाख रुपये ऑनलाइन पाठवले, त्यानंतर ५ लाख रुपये असे करून ४५ लाख रुपये त्यांनी वेगवेगळ्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने पाठवले.
काही दिवसांनी पवार यांनी राहुल प्रजापती यांना फोन करून फाईलची चौकशी केली असता त्यांनी टाळाटाळ सुरू केली, आपली फसवणूक झाल्याचे कळताच पवार यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शनिवारी सांताक्रूझ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पथक तयार करण्यात आले असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community