रेल्वे ट्रॅकजवळ आढळला तरुणाचा मृतदेह; २८ वेळा चाकू भोसकून केली हत्या

162
कुर्ला रेल्वे स्थानकापासून ३०० मीटर अंतरावर रेल्वे ट्रॅकच्या शेजारी असलेल्या झाडीत एका २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी दुपारी आढळून आला आहे. या तरुणाला २८ वेळा चाकू भोकसून ठार करण्यात आल्याची माहिती कुर्ला पोलिसांनी दिली आहे.
या तरुणाची ओळख पटवण्यात आली असून हा तरुण घाटकोपर पश्चिम येथे राहणारा असल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दूल यांनी दिली आहे. या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारेकऱ्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती शार्दूल यांनी दिली.
निखिल सावला (२४) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. निखिल हा घाटकोपर पश्चिम आझाद नगर येथे राहणारा आहे. निखिल बेरोजगार असून त्याचे वडील रिक्षा चालवतात, आई घरकाम करते. निखिलला अमली पदार्थाचे व्यसन होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दूल यांनी दिली. मंगळवारी दुपारी निखिलचा मृतदेह कुर्ला रेल्वे स्थानकापासून ३०० मिटरवर असलेल्या झाडीत सापडला. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या २८ खुणा शरीरावर आढळून आल्याने त्याचा मृत्यू  अपघाती नसून त्याची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुर्ला रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन राजवाडी रुग्णालय येथे पूर्वतपासणीसाठी पाठवला आहे. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर आईची फिर्याद घेऊन अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, रात्री त्याला एका व्यक्तीने फोन करून बोलावून घेतले, मी थोड्या वेळात येतो असे तो सांगून घरातून बाहेर पडला. रात्री साडेअकरा वाजता त्याचा कॉल आला असता मी मानखुर्द येथून ट्रेनने येत असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री एक वाजता त्याला फोन केल्यावर त्याचा फोन बंद दाखवत होता. त्याला नशा करण्याची सवय असल्यामुळे कुठेतरी नशेत झोपला असावा सकाळी येईल असा समज करून आम्ही  त्याला पुन्हा कॉल केला नाही.
सकाळी मात्र निखिल घरी न आल्यामुळे चिंता वाढली आणि आम्ही त्याचा शोध घेऊ लागलो. मात्र त्याचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता, असे निखिलच्या आईने आपल्या फिर्यादीत म्हटले असल्याचे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिकी शार्दूल यांनी सांगितले. निखिलला आलेले शेवटचे कॉल तसेच त्याला कॉल करून बोलवणाऱ्याची माहिती काढण्यात येत असून लवकरच या हत्येचा उलगडा होईल, अशी शक्यता  शार्दूल यांनी वर्तवली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.