बेसबॉल बॅटने ७४ वर्षांच्या आईची हत्या करून मृतदेह माथेरानच्या डोंगरावरून अडीच हजार फूट दरीत फेकला होता. मात्र दीडशे फुटावर मृतदेह झाडीत अडकल्यामुळे पोलिसांच्या हाती लागला आहे. जुहू पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे. या हत्येप्रकरणी बुधवारी पोलिसांनी ४५ वर्षीय मुलाला आणि नोकराला अटक केली होती.
मुंबईतील जुहू येथील कल्पतरू सॉलिटेअर सोसायटीमध्ये वीणा कपूरची घरातच हत्या केल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी मुलगा सचिन कपूर (४०) आणि तीचा केअरटेकर छोटू यांना अटक केली. आरोपी सचिनने आईच्या अंगावर बेसबॉलच्या बॅटने वार करून हत्या केली. हत्येसाठी वापरण्यात आलेली बॅट अद्याप सापडलेली नाही.
मंगळवारी रात्री उशिरा सचिन त्याची आई वीणा कपूरसोबत घरात होता आणि पहाटे चहा बनवण्यावरून त्यांच्यात भांडण झाले होत. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा बाथरूम स्वच्छतेवरून त्यांच्यात भांडण झाले. रात्री उशिरा त्यांच्या घरी भांडण झाले आणि सचिनने त्याचीआई वीणाला धक्काबुक्की करून बेसबॉलच्या बॅटने तिच्या डोक्यात प्रहार केला. त्यानंतर सचिन त्याच्या बेडरूममध्ये गेला. घटना घडली त्यावेळी केअरटेकर छोटू घरात हजर होता, त्याने मालकीण मृत झाल्याचे सचिनला बेडरूममध्ये जाऊन सांगितले. सचिन बेडरूममधून बाहेर आला आणि त्याने तपासले असता आईचा मृत्यू झाल्याचे त्याला समजले. सचिनने केअरटेकर छोटूला घटनेबद्दल कोणाला काही कळू देऊ नको अशी तंबी देत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास त्याची मदत करण्यास सांगितले.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, “आरोपी सचिन खूप हुशार आहे, त्याने हत्येपूर्वी मृतदेह फेकलेल्या ठिकाणी भेट दिली होती. काही दिवसांपूर्वी तो अमृतसरला त्याच्या गावीही गेला होता. खून होण्यापूर्वी त्याने कुठे भेट दिली होती, आम्ही त्याचे सीडीआर तपशील तपासत आहोत. बेसबॉल बॅटवरही संशय आहे की तो बेसबॉलचा खेळाडू नव्हता आणि ही बॅट घरात कशी आली आणि तरीही ती सापडलेली नाही. आम्ही पुन्हा माथेरानच्या डोंगरावर बेसबॉलची शोधमोहीम राबवू.”
( हेही वाचा: कमलकांत यांची हत्या म्हणजे ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ )
पोलिसांना घरात डझनभर बॉक्स सापडले, “आम्हाला घरात डझनभर बाॅक्स आढळून आले. आम्ही चौकशी केली असता सचिनने आम्हाला सांगितले की, हे बॉक्स खूप जुने असून त्यात पार्सल आले होते. हे बॉक्स घरी का ठेवले आहेत हे आम्ही तपासत आहोत असे पोलिसांनी सांगितले. मुलाने आईच्या हत्येची योजना यापूर्वीच आखून ठेवली असणार, त्यासाठी त्याने सर्व वस्तूंची जुळवाजुळव करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकाण देखील शोधून ठेवले होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp Community