सावधान! ‘झोमॅटो’ आणि ‘स्वीगी’ बॉय बनून केली जातेय लूटमार

शहरामध्ये ऑनलाइन वस्तू खरेदी करण्यावर अधिक भर दिला जात आहे. ऑर्डर केलेल्या वस्तू घरपोच करण्यासाठी कंपनीने डिलेव्हरी बॉयची व्यवस्था केली आहे.’परंतु एक लक्षात असू द्या तुम्ही ऑनलाइन ऑर्डर केलेली वस्तू किंवा खाद्यपदार्थ घरी घेऊन येणारा डिलेव्हरी बॉय खरा आहे की, त्याच्या वेशात दुसराच कोणीतरी आहे याची खात्री करूनच दार उघडा! नाहीतर तुमच्यासोबतदेखील एखादी दुर्घटना होऊ शकते.
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात झोमॅटो आणि स्वीगी डिलेव्हरी बॉईजचे टी-शर्ट घालून लुटणाऱ्या टोळ्या शहरात फिरत आहे. या टोळ्या डिलेव्हरीच्या नावाखाली घरात घुसून लूटमार करत असल्याच्या दोन घटना ठाण्यात घडल्या आहेत. या घटना ठाण्यातील नौपाडा आणि भिवंडी शहरात घडल्या असून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी शहरात झोमॅटो डिलेव्हरी बॉईजचे टी शर्ट घालून आलेल्या तीन जणांनी बेसिन कॅथलिक को-ऑपरेटिव्ह बँकेची ११.७५ लाख रुपयांची रोकड लुटून पोबारा केला होता. पोलिसांनी या तिघांना अटक केली असून, या तिघांजवळून झोमॅटो डिलेव्हरी बॉईजचे टी शर्ट आणि लुटलेली रोकड जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वीगी डिलेव्हरी बॉईजचे टी शर्ट घालून आलेल्या लुटारूंनी डिलेव्हरी देण्याच्या निमित्ताने एका घरात घुसून महिलेला मारहाण करून घरातील काही वस्तू लुटून घेऊन गेले. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या लुटारूंचा कसून शोध घेण्यात येत आहे. या घटनांमुळे दुपारच्या वेळी एकटे दुकट्या राहणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here